मिरा भाईंदर, वसई-विरारचे नवे पोलीस आयुक्त निकेत कौशिक; मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली

वसई | 10 जुलै:मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक निकेत कौशिक यांची नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी मिरा रोड येथे झालेल्या मराठी मोर्च्याच्या अयशस्वी हाताळणीमुळे झाल्याची जोरदार चर्चा आहे.
मधुकर पांडे हे मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे दुसरे पोलीस आयुक्त होते. त्यांच्या कार्यकाळात मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, मनसेने आयोजित केलेल्या मराठी हक्कासाठी मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची कारवाई व वागणूक वादात सापडली होती.
मंगळवारी मनसेच्या मोर्च्याला परवानगी नाकारली गेली होती, त्याचबरोबर वसई, विरार आणि मिरा भाईंदर परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांची विनाकारण धरपकड करण्यात आली होती. मोर्चा रोखण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणामुळे सरकारवर आणि पोलिसांवर राजकीय आणि सामाजिक दबाव वाढला होता.
नंतर, दुपारी मोर्च्याला परवानगी देण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. पांडे यांनी घटनेची योग्य व निष्पक्ष हाताळणी केली नाही, असा आरोपही काही नेत्यांकडून करण्यात आला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, गृहविभागाने बुधवारी तात्काळ आदेश जारी करून पांडे यांची बदली केली असून त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी निकेत कौशिक यांनी नवीन आयुक्त म्हणून पदभार घेणार आहेत.
What's Your Reaction?






