मीरा-भाईंदर मनपाच्या नियोजनातील चुका; ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत मुलांच्या सुरक्षेला धक्का

मीरा-भाईंदर मनपाच्या नियोजनातील चुका; ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत मुलांच्या सुरक्षेला धक्का

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उपक्रमांमधील नियोजनातील हलगर्जीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘माझी वसुंधरा’ मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत लहान मुलांना प्रचंड उन्हाच्या तडाख्यात उघड्यावर बसवून स्पर्धा घेण्यात आली. यामुळे पालिकेच्या व्यवस्थापनावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्पर्धा आयोजित करण्यासाठी योग्य बंदिस्त जागेची निवड न करता खुल्या मैदानात मुलांची सुरक्षा दुर्लक्षित केली गेली, अशी टीका होत आहे. उन्हाचा पारा चढलेला असताना मुलांना अशी अडचणीत टाकणे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे ठळक उदाहरण ठरले आहे.

याचप्रमाणे, ‘किल्ला सायक्लोथॉन’ स्पर्धेदरम्यानही मनपाचे नियोजन फसले. स्पर्धेच्या एक दिवस आधी 'नवराष्ट्र' मध्ये उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले होते, परंतु त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी, स्पर्धेदरम्यान एक सायकलस्वार बॅरीगेट तोडून किल्ल्याजवळून खाली पडला आणि गंभीर दुखापत झाली. अधिक धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी रुग्णवाहिका किंवा स्वयंसेवक उपस्थित नव्हते. जखमी स्पर्धकाला स्वतः सायकल चालवत खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले.

या घटनांवर मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. “जर तुम्हाला योग्य नियोजन करता येत नसेल, तर अशा स्पर्धा आयोजितच करू नका,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले, “आपल्याला माहिती नसेल तर असे कार्यक्रम राबवणाऱ्या संस्थांना एकत्र घेऊन नियोजन करायला हवे होते. स्थानिक नागरिक जर तुमच्या कार्यक्रमात सहभागी होत असतील, तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील तुमचीच आहे.”

नागरिकांनी देखील पालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली असून, अशा नियोजनशून्य उपक्रमांत वेळ आणि संसाधने वाया घालवू नयेत, अशी मागणी केली आहे. तसेच, या घटनांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

“उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? हेच प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.”

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow