वसई: रामनवमी निमित्ताने विरारमध्ये सकल हिंदू समाजाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेवर अंडी फेकण्यात आल्याने निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. या घटनेनंतर बोळींज पोलिसांनी परिसरातील १५ सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करून ४ संशयितांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी परिस्थिती शांत झाली असून खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

रविवारी संध्याकाळी रामनवमीच्या निमित्ताने सर्वेश्वर मंदिर चिखल डोंगरीपासून पिंपळेश्वर मंदिर ग्लोबल सिटीपर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेमध्ये १५० हून अधिक दुचाकी, रथ, आणि २ टेम्पो यांचा समावेश होता. हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले होते.

रात्रौ सुमारे ८ वाजता एकता पार्कजवळून शोभायात्रा जात असताना अज्ञात व्यक्तीने अंडी फेकली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली. बोळींज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्राथमिक तपासणीत असे आढळले की शोभायात्रेतील ३-४ बाईकस्वार रॅलीतून बाहेर जाऊन एका गल्लीतून जात असताना अज्ञात व्यक्तीने वरून अंडी फेकली. या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करून बोळींज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोळींज पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) प्रकाश सावंत यांनी सांगितले की, सध्या तणाव निवळला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे.