मुलुंड: पार्किंग वादातून धमकी मिळाल्यानंतर जेष्ठ नागरिकाची रेल्वेखाली आत्महत्या

मुंबई:मुलुंड उपनगरातील मनीषा प्राईड इमारतीत राहणाऱ्या 67 वर्षीय जेष्ठ नागरिक खुशाल दंड यांनी लोकल ट्रेनखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या पार्किंगवरून झालेल्या वादानंतर, कुमकुम मिश्रा नावाच्या महिलेने विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्याची धमकी दिली होती, ज्यामुळे खुशाल दंड मानसिक तणावात होते.
घटनाक्रमानुसार, 7 ऑगस्टला कुमकुम मिश्रा यांनी लिफ्टजवळ दंड यांना डास मारण्याच्या रॅकेटने मारहाण केली आणि खोट्या गुन्ह्याची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. यामुळे खुशाल दंड यांची तब्येत बिघडली होती, परंतु ते काही वेळ शांत होते. दुसऱ्या दिवशी पहाटे, नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी बाहेर पडलेले दंड घराकडे परतले नाहीत. मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ त्यांचा मृतदेह सापडला.
पोलिस तपासानुसार, दंड यांनी ट्रेन ट्रॅकवर बसून आत्महत्या केली. रेल्वे मोटरमनने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु ट्रेन वेळेत थांबली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. दंड यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कुमकुम मिश्रा यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तिला अटक करण्यात आली.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
What's Your Reaction?






