मोदी सरकारच्या काळात पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी - रघुराम राजन

नवी दिल्ली:गेल्या 10 वर्षांत भारताने पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. परंतु दुसरीकडे देशांतर्गत उत्पादन आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी इतर क्षेत्रांमध्ये अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजन बोलत होते. भारताला या दशकातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी 7 टक्के विकास दर पुरेसा असेल का, असे विचारले असता राजन म्हणाले की, सात टक्क्यांच्या दराने विकास झाला तर आपण जर्मनीला आणि तीन वर्षांत जपानला मागे टाकू. ही काही अशक्य गोष्ट नाही. सर्वात चिंतेची बाब म्हणजे जेव्हा आपण विकसित राष्ट्र म्हणतो, तेव्हा विकसित होणे म्हणजे काय हे आपण तपासले पाहिजे?
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील सर्वाधिक गरज शिक्षणावर भर देण्याची आहे. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर सरकारचे लक्ष हे योग्य पाऊल आहे, परंतु हे काम योग्यरित्या पार पाडणे देखील महत्त्वाचे आहे.
मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा हेतू चांगला आहे. पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात आपण बरेच काही केले आहे, असे मला वाटते. दरम्यान सरकारने आपल्या टीकाकारांकडून इतर क्षेत्रातील आवश्यक पावलांची माहिती गोळा करून त्यानुसार काम केले पाहिजे. जर आपण त्यावर लक्ष केंद्रित केले तर मला वाटते की, मेक इन इंडियाच्या संकल्पनेला बळ मिळेल, असेही राजन म्हणाले.
What's Your Reaction?






