लॉरेन्स बिष्णोईला विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर ?

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यांनतर फुटाफुटीच्या आणि पक्ष प्रवेशाच्या बातम्यांना उधाण आले असतानाच चक्क लॉरेन्स बिष्णोईला एका पक्षाने निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे तसेच या पक्षाने बिष्णोईची तुलना शहीद-ए- आझम सरदार भगतसिंग यांच्याशी केल्याने वाद होण्याची चिन्हे आहेत.
लॉरेन्स बिष्णोई सध्या अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. उत्तर भारतीय विकास सेनेने (UBVS) लॉरेन्स बिष्णोईला निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. इतकंच नाही तर पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याबाबत लॉरेन्स बिष्णोईला पत्रही लिहिले आहे. शिवाय आपला पक्ष बिष्णोईला विजयासाठी देखील मदत करणार असल्याचं या पात्रात शुक्ला यांनी म्हटलं आहे.
मुंबई विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेचे ४ उमेदवार रिंगणात असतील हे निश्चित झाले आहे उर्वरित ५० उमेदवारांची यादी लॉरेन्स बिष्णोईच्या मंजुरीनंतर निश्चित केली जाईल असेही त्या पत्रात लिहिले आहे. तसेच ते पुढे पत्रात लिहितात की, आमचा पक्ष हा उत्तर भारतीयांच्या हक्कासाठी काम करतो. आमचा पक्ष हा राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्यात दोन्हीकडे नोंदणीकृत पक्ष आहे. तसेच लॉरेन्स बिष्णोई विषयी आम्हाला अभिमान आहे असेही या पत्रात म्हटले आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्त्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोईचे नाव घेतले जात होते त्यातच गँगस्टर बिष्णोई टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याबाबत मुंबई पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान लॉरेन्स बिष्णोईचा एन्काऊंटर करा आणि एक कोटी मिळवा अशी घोषणा करणी सेनेकडून करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या मागे बिष्णोई टोळी हात धुवून लागली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर करणी सेनेकडून हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. क्षत्रिय करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती प्रसारित केली आहे.
What's Your Reaction?






