वसई- विरार महापालिकेचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर; नागरिकांसाठी अनेक नवीन योजनांची घोषणा

विरार, ७ मार्च २०२५ – वसई- विरार शहर महानगरपालिकेचा सन २०२५-२६ चा मूळ अर्थसंकल्प आज प्रशासक आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडून सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शहरातील विविध सुधारणा आणि नागरी सुविधांवर भर देण्याचा मनोदय पालिकेने व्यक्त केला आहे. सन २०२४-२५ च्या सुधारित अर्थसंकल्पासह सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ८१४ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असून, यावर्षीचा एकूण बजेट ३ हजार ९२६ कोटी ४४ लाख रुपयांचा आहे.
करवाढ नाही, नागरिकांसाठी दिलासा
या वर्षीच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे पालिकेने कोणतीही करवाढ केली नाही, ज्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, या अर्थसंकल्पात नागरी सुविधांच्या सुधारणेसाठी आणि नवीन सुविधा प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केली आहे.
महत्वाचे क्षेत्र
पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण योजना आणि इतर महत्त्वाच्या योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. विशेषत: शहरातील अग्निशमन आणि आणिबाणी सेवा विभागासाठी सन २०२४-२५ मध्ये १८ कोटी १९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती, तर सन २०२५-२६ साठी ५९ कोटी ४७ लाख रुपये राखीव ठेवले आहेत.
स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन
शहरातील दैनंदिन साफसफाई, डास निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी ५९३ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आरोग्य क्षेत्रात भरीव तरतूद
गरोदर मातांसाठी आरोग्य तपासणी, टेली कन्सल्टेशन, लसीकरण, आरोग्यवाचक जनजागृती, मोफत औषधे आणि प्राथमिक तपासणी यांसाठी २०२४-२५ मध्ये ६७ कोटी ४१ लाख रुपये, तर २०२५-२६ मध्ये ८८ कोटी ५१ लाख रुपये राखीव ठेवले आहेत.
दिव्यांग कल्याण आणि महिला कल्याण
दिव्यांग कल्याणासाठी २०२५-२६ मध्ये ११ कोटी ७० लाख रुपये तरतूद केली असून, महिला व बालकल्याणासाठी २१ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकासकामे
शहर सौंदर्यीकरण, चौक, वाहतूक बेट, समाजमंदिर, नाट्यगृह, स्मशानभूमी व्यवस्थापन, तलाव सुशोभिकरण यांसाठी १०११ कोटी ६७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय, जॉगर्स ट्रेक, क्रिडा साहित्य, उद्यान देखभाल यासाठी ३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शालेय कला आणि क्रीडा महोत्सव
शालेय कला आणि क्रीडा महोत्सव, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नालेखोदाई आणि पूरप्रतिबंधक उपाययोजना
नालेखोदाई आणि पूरप्रतिबंधक कामांसाठी २४ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.
नागरिकांना दिलासा, अधिक सुविधा
या अर्थसंकल्पातून वसई- विरार शहराच्या विकासावर भर देण्यात आला आहे. पालिकेने विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचा संकल्प घेतला असून, आगामी काळात नागरिकांना अधिक सुविधा आणि सेवा मिळाव्यात यासाठी अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाईल.
What's Your Reaction?






