वसई-विरार महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोना विरोधात सज्ज

वसई, दि. २९ मे २०२५: मुंबई, ठाणे आणि इतर शहरी भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महापालिकेने आपल्या आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या स्थितीत ठेवले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत असून "महापालिका आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे," असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक श्री. अनिलकुमार पवार यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ‘आपला दवाखाना’, आयुष्मान आरोग्य केंद्रे, तसेच वस्ती भाग आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची तपासणी सुरू असून ५५११ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९६ जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून केवळ एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. संबंधित रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांची माहिती गोळा केली जात असून कोरोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
चंदनसार येथील जीवदानी रुग्णालय आणि वसई पूर्वेतील फादरवाडी रुग्णालयात प्रत्येकी २५ स्वतंत्र खाटा कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, ऑक्सिजनच्या नियमित पुरवठ्यासाठी महापालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून ५ आपत्कालीन ऑक्सिजन प्रकल्पांमधून तातडीने पुरवठा केला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरात संभाव्य कोरोना वाढ रोखण्यासाठी यंत्रणेला आवश्यक सूचना आणि दिशा निर्देश देण्यात आले.
महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर, हात स्वच्छ ठेवणे, तसेच सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






