वसईकरांना नाताळचे वेध ! नाताळ गोठ्यासाठी लागणाऱ्या प्रतिकृतींना मोठी मागणी

वसईकरांना नाताळचे वेध ! नाताळ गोठ्यासाठी लागणाऱ्या प्रतिकृतींना मोठी मागणी

वसई - वसईत ख्रिस्ती समाज मोठ्या प्रमाणावर असून डिसेंबरमध्ये साजरा होणारा नाताळ सण हा ख्रिस्ती धर्मियांचा सर्वात मोठा सण असतो. हा सण जल्लोषात साजरा करण्यासोबतच नाताळ गोठा अर्थात ख्रिसमस क्रिब बनविण्याची परंपरा आहे. वसईत यासाठी विविध ठिकाणी नाताळ गोठा स्पर्धा भरविली जाते. नाताळ सणाच्या दिवसात गावा गावात मोठे देखावे पाहायला मिळतात तसेच आपला देखावा सर्वोत्तम व्हावा यासाठी देखील चढाओढ असते. गोठा बनविण्यासाठी लागणाऱ्या प्रतिकृतींना मोठं महत्व आणि मागणीही असते. 

मागील काही वर्षांपासून या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू झाला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिक तापमान वाढ, इंटरनेटचे दुष्परिणाम, कौटुंबिक समस्या, बदलती जीवनशैली, इत्यादी अनेक विषय मांडून समाजप्रबोधनाचं प्रभावी माध्यम ठरलं आहे. वसईतील बावखले वाचवण्यासाठी काही वर्षापूर्वी याच माध्यमातुन सुरवात झाली होती. 

नाताळ गोठ्यांसाठी ख्रिस्त काळातील दृश्य हुबेहूब दाखवण्यासाठी अशा प्रतिकृतींना मोठी मागणी आहे. त्यामुळे वसईतील कारागीर सध्या या मुर्त्या तयार करण्यात व्यस्त झाले आहेत. देखाव्यांसाठी लागणारे मुर्त्यांचे असे संच उपलब्ध असतात. यांची किंमत ५०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत असते. ४ इंचापासून ते १२ इंचापर्यंत विविध आकारात प्रतिकृती तयार केल्या जातात. एका संचात १७ विविध मुर्त्या असतात. यात उंट, कोकरू, देवदूत आणि बाळ येशू तसेच ख्रिस्त काळातील माणसांच्या प्रतिकृती असतात. 

वसईत तयार होणाऱ्या अशा मूर्त्यांना वसईसह मुंबई, पुणे, अहमदाबाद या शहरांमधून मागणी वाढत चालली आहे. हेच व्यावसायिक आता हळूहळू मेणबत्ती व्यवसायातही उतरले आहे. १ रुपयांपासून ते १ हजार रुपयापर्यंत किमतीच्या मेणबत्त्या उपलब्ध असतात. नाताळ आगमनापूर्वी अशा मूर्तींचे संच तयार होऊन बाजारापेठेत विक्रीसाठी जाण्यासाठी तयार आहेत. 

व्यावसायिकांना वाढत्या महागाईचा फटका बसल्याचेही दिसून येत आहे. कच्च्या मालाचे दार वाढले असून त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतींवर होत आहे. यासाठी लागणारे रंग, माती, व अन्य कच्च्या मालाचे दर मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास ३३ टक्के वाढले आहेत. त्यामुळे दर वाढवणे क्रमप्राप्त झाले असल्याचे या क्षेत्रातील व्यवसायिक सांगतात.असे असले तरीही या मूर्त्यांना असलेली मागणी मोठी आहे. त्यामुळे या क्षेत्रात कारागिरांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow