वसईत साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

साहित्य जल्लोष प्रतिष्ठानकडून स्पर्धा, परिसंवाद आणि कवीसंमेलनाचे आयोजन

वसईत साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

विरार - वसईतील साहित्य जल्लोष प्रतिष्ठानकडून दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आणि विविध साहित्यिक कार्यक्रम होणार आहेत. यात मराठीतील मान्यवर साहित्यिक सहभागी होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे उपस्थित राहणार आहेत. साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित वसई विरार महानगरपालिकेचा ग्रंथालय विभाग आणि माणिकपूरच्या यंग मॅन कॅथॉलिक असोसिएशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. 

१७ जानेवारीला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कथाकथन आणि कविता सादरीकरण स्पर्था होणार आहे. तर १८ जानेवारीला सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी काढली जाणार असून वसई विरार मनपा - एच कार्यालय ते माणिकपूर येथील वाय.एम.सी.ए सभागृह असा ग्रंथदिंडीचा मार्ग असणार आहे. 

१८ जानेवारीला सकाळी १० वाजता डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन होणार असून यावेळी ग्रंथप्रकाशन आणि पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. दुसऱ्या सत्रात 'अभिजात मराठी भाषा आणि आपली जबाबदारी' या विषयावर परिसंवाद होणार असून रसिकांना यावेळी मान्यवरांचे विचार ऐकता येणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ संपादक महेश म्हात्रे, मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप सामंत, मराठी चित्रपट विकास मंडळाचे संचालक संजय पाटील, माजी प्राचार्य फा. सॅबी कोरिया आणि ललित लेखिका राणी दुर्वे सहभागी होणार आहेत. 

तिसऱ्या सत्रातील कवीसंमेलातून प्रिया कलिका बापट, नंदू सावंत, हेमांगी नेरकर, धनश्री गणात्रा, प्रसाद कुलकर्णी आणि स्थानिक कवींच्या कवितांचा आस्वाद यावेळी रसिकांना घेता येणार आहे. चौथ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून 'गर्जा महाराष्ट्र माझा' हा महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा दर्शविणारा नृत्य आणि मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow