मुंबई:शिवसेनेच्या शिंदे गटाची विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांचा समावेश असून दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदेनी जाहीर केली आहे. महायुतीचे नेते विरोधी पक्षांवर सतत घराणेशाहीचे आरोप करत असतात मात्र  शिंदेनी जाहीर केलेल्या उमेदवारी यादीतील ४५ उमेदवारांपैकी अनेक उमेदवार हे शिंदेंच्या शिवसेतील नेत्यांच्या कुटुंबीयांपैकी आहेत ज्यात अनेकांचे वडील, भाऊ आणि पती हे विद्यमान आमदार किंवा मंत्री आहेत. या निवडणुकीत अनेक नवे आणि तरुण चेहेरे पाहायला मिळतील असे चित्र असताना प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे. एरंडोल, दर्यापूर, पैठण, जोगेश्वरी पूर्व, राजापूर व खानापूर मतदारसंघातून प्रस्थापित नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसघातून शिवसेना (शिंदे गटाचे ) नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एरंडोलमधूल अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या मुलाला म्हणजेच विलास भुमरे यांना उमेदवारी दिली आहे. सांगलीच्या खानापूरमधून अनिल बाबर यांचे पूत्र सुहास बाबर यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. काही ठिकाणी भाजपा आणि शिंदे गटात उमेदवारीविषयी एकमत होत नव्हते पैकी रवींद्र वायकर आता वायव्य मुंबईचे खासदार झाल्याने त्यांच्या मतदार संघातून जोगेश्वरी पूर्व मधून त्यांच्या पत्नीला मनीषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत यांच्या उमेदवारीसोबतच राजापूर मतदारसंघातून त्यांच्या भावाला किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच दापोलीतून पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे.