सुदृढ आणि स्वच्छ समाज घडवण्यासाठी आध्यात्म आवश्यक - राष्ट्रपती

सुदृढ आणि स्वच्छ समाज घडवण्यासाठी आध्यात्म आवश्यक - राष्ट्रपती

माऊंट अबू:अध्यात्मिकता म्हणजे धार्मिक असणे किंवा सांसारिक सुखाचा त्याग करणे असे नाही. अध्यात्म म्हणजे अंतरंगातील शक्ती ओळखून आचार आणि विचारांमध्ये शुद्धता आणणे होय. विचार आणि कृतींमध्ये शुद्धता हाच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संतुलन आणि शांतता राखण्याचा मार्ग आहे, असे त्या म्हणाल्या. सुदृढ आणि स्वच्छ समाज घडवण्यासाठी आध्यात्म आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. राजस्थानमधील माउंट अबू येथे शुक्रवारी प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाने आयोजित केलेल्या 'निर्मल आणि निरोगी समाजासाठी अध्यात्म' या विषयावरील जागतिक शिखर परिषदेत भाग घेतला.

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वच्छता ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. आपण केवळ बाह्य स्वच्छतेवर लक्ष केंद्रित न करता मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही स्वच्छ असले पाहिजे. संपूर्ण आरोग्य निर्मल मानसिकतेवर आधारित आहे. भावनिक आणि मानसिक आरोग्य योग्य विचारांवर अवलंबून असते कारण आपले विचारच शब्दाचे आणि वर्तनाचे उगमस्थान आहे. इतरांबद्दल मत तयार करण्यापूर्वी आपण स्वतःच्या अंतरंगात डोकावले पाहिजे. स्वतःला इतर कोणाच्या तरी परिस्थितीत ठेवून विचार केला तरच आपण योग्य मत तयार करू शकतो, असेही त्या म्हणाल्या.

अध्यात्म हे केवळ स्व विकासाचे साधन नाही तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा आपल्याला स्वतःच्या आंतरिक शुद्धतेची जाण होईल तेव्हाच आपण निरोगी आणि शांतताप्रिय समाजाच्या स्थापनेत योगदान देऊ शकू. शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक न्याय यासारख्या समाज आणि वसूंधरेशी संबंधित अनेक समस्यांची उत्तरे केवळ अध्यात्मातूनच मिळू शकतात. भौतिकवाद आपल्याला क्षणिक शारीरिक आणि मानसिक समाधान देतो, ज्याला आपण खरा आनंद मानतो आणि आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. ही आसक्तीच आपल्या असंतोषाचे आणि दुःखाचे कारण बनते. दुसरीकडे, अध्यात्म आपला स्व जाणून घेण्यासाठी आणि आपल्या अंतर्मनाला ओळखण्यासाठी मदत करते. आजच्या जगात शांतता आणि एकतेचे महत्त्व अधिक वाढले आहे. जेव्हा आपण शांत असतो तेव्हाच आपल्याला इतरांबद्दल सहानुभूती आणि प्रेम वाटू शकते, असे राष्ट्रपतींनी सांगितले. योगाची शिकवण आणि ब्रह्माकुमारीसारख्या आध्यात्मिक संस्थांमुळे आपल्याला आंतरिक शांतीचा अनुभव मिळतो. ही शांतता केवळ आपल्यातच नाही तर संपूर्ण समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकते, असे त्या म्हणाल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow