आगरी सेनेविरोधात वसई-विरार महापालिका अधिकाऱ्यांचे निषेध आंदोलन

आगरी सेनेविरोधात वसई-विरार महापालिका अधिकाऱ्यांचे निषेध आंदोलन

विरार : वसई-विरार महापालिका अतिरिक्त आयुक्तांना दमदाटी व शिवीगाळ करत; त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन धक्काबुक्की करण्याचा तसेच कार्यालयातील साहित्य तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याने आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्या विरोधात वसई-विरार महापालिका कर्मचाऱ्यांनी सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारच्या वेळेत वसई -विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या केबिनमध्ये आगरी सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी विनापरवानगी जबरदस्तीने घुसून अतिरिक्त आयुक्तांना दमदाटी व शिवीगाळ केली होती.

तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन धक्काबुक्की करण्याचा तसेच कार्यालयातील साहित्य तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त यांच्या शेजारी असलेल्या महानगरपालिका आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ व दमदाटी केली होती. या घटनेच्या निषेधारी शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालयातील महासभा सभागृहात आयुक्तांच्या उपस्थितीत जाहीर निषेध सभा घेण्यात आली. या निषेध सभेस महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना अशाप्रकारे विनाकारण, हेतुपरस्पर धमकावणे व शिवीगाळ करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अशाप्रकारे दमदाटी व शिवीगाळ करणे हा प्रकार अतिशय निंदनिय असून याला आळा घालणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रित येऊन पोलीस प्रशासन व शासन यांच्याकडे संबंधितांची तक्रार करण्याचे ठरविण्यात आले. या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फत हाताला काळी फित बांधून निषेध करणार आहेत

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow