आमदार गीता जैनच्या भावाविरोधात आचारसंहिताभंगाचा गुन्हा रिक्षाचालकांना भेटवस्तूचे वाटप

भाईंदर :- रिक्षा चालकांना भेटवस्तू देऊन विनापरवानगी प्रचाराचे स्टिकर वाहनांवर लावल्याप्रकरणी आमदार गीता जैन यांचे बंधू सुनिल जैन यांच्याविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे. निवडणुक प्रक्रिया निर्भीड व सुरळीतपणे पार पडावी,म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाखाली शहरात भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. १९ ऑक्टोबर रोजी भाईंदरच्या अग्रवाल उद्यानात रुद्र फाउंडेशन तर्फे रिक्षाचालकांना भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. याबाबतची तक्रार भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी आचारसंहिता भंग झाल्याचा कोणताही प्रकार दिसून आला नव्हता. मात्र याच कार्यक्रमाची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. यात रिक्षा चालकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आल्याचे तसेच आमदार गीता जैन यांच्या प्रचाराचे स्टिकर वाटण्यात आल्याचे दिसून आले. या स्टिकर मध्ये ' मिरा-भाईंदर की एकही पुकार, फिर एक बार गीता आमदार ' असा मजकूर लिहण्यात आला होता. या संदर्भात चौकशी केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून कोणतीही परवानगी घेतल्याचे आढळून आले.
याप्रकरणी भरारी पथकाचे प्रमुख राजेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रुद्र फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार गीता जैनचे बंधू सुनिल जैन यांच्याविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यातभारतीय न्याय संहितेच्या कलम १७६, २२३ तसेच लोकप्रतिधित्व अधिनियमाच्या कलम १२७ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मिरा भाईंदर शहरातील आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा आहे.
What's Your Reaction?






