उद्धव ठाकरे यांचा SEC वर हल्लाबोल: "VVPAT नसेल, तर निवडणुकांचं काय अर्थ?"

नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये VVPAT यंत्रांचा वापर न करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या (SEC) निर्णयावर तीव्र शब्दात टीका केली आहे.
"EVM वर शंका उपस्थित झाल्यावर VVPAT आणली होती. आता जर ती वापरणारच नाही, तर निवडणुका घेऊन काय उपयोग? थेट विजेते घोषित करा. आपल्याला मत कुणाला दिलं हेच माहिती नाही, मग निवडणुकांचं औचित्य काय?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
त्यांनी बिहारमधील मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "ही NRC मागच्या दरवाजाने आणण्याची तयारी आहे का?" असा संशय व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत म्हटलं, "गद्दार तो गद्दारच असतो. मी त्याला फार महत्त्व देत नाही. तो आपल्या मालकांना भेटायला गेला आहे."
पुढे बोलताना ठाकरे यांनी भाजपप्रणीत एनडीए सरकारवरही टीका केली. त्यांनी परराष्ट्र धोरण अपयशी ठरल्याचा आरोप केला आणि मोदी-शहा जोडीवर "ते राष्ट्रीय नेते नसून केवळ प्रचार व्यवस्थापक आहेत" असा आरोप केला.
"ट्रंप यांनी मोदींची थट्टा केली, पण त्यावर मोदींनी ठोस उत्तरही दिलं नाही," असं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील घणाघात केला.
शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीबाबत विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "हा निर्णय मी आणि राज ठाकरेंनीच घ्यायचा आहे. तिसऱ्या कोणाचंही मत नको."
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मराठी उमेदवार दिल्यास पाठिंबा देणार का? यावर ठाकरे म्हणाले, "उमेदवार कोण आहे हे समजल्यावरच निर्णय घेऊ. सध्या आधीचा उपाध्यक्ष का हटवण्यात आला हेच समजून घ्यायचं आहे."
What's Your Reaction?






