खाऊगल्लीतील स्टॉल्सना वसई महापालिकेच्या नोटीसा; कर विभागाचे अधीक्षक राजीव पाटील यांची प्रतिक्रिया

विरार : नरवीर चिमाजी आप्पा मैदानाशेजारील नाल्यावरील खाऊगल्लीतील स्टॉल्सना वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘आय`च्या अतिक्रमण विभागाने नोटीसा बजावल्या आहेत, अशी माहिती कर विभागाचे अधीक्षक राजीव पाटील यांनी दिली. त्यामुळे लवकरच वसईकरांना या स्टॉल्सविरोधात निष्कासन कारवाई अपेक्षित आहे.
या नाल्यावरील स्लॅब कमकुमवत झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी बाजार व अतिक्रमण विभागाला बजावलेल्या नोटिसीत नाल्यावरील तब्बल 80 हातगाड्यांमुळे हजारो नागरिकांचा जीव धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली होती. सदर नाल्याचे डिझाइन ‘सेल्फ लोड` विचारात घेऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे नाल्याचा स्लॅब अतिरिक्त भार घेऊ शकणार नाही; किंबहुना या भारामुळे स्लॅब कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार विभाग व अतिक्रमण विभागाने या नाल्यावरील अनधिकृत खाऊगल्ली तात्काळ हटवावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने केली होती. याबाबत दोनदा स्मरणपत्र या विभागांना देण्यात आलेली होती. मात्र या दोन्ही विभागांनी त्याची दखल घेतलेली नव्हती. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) पालघर जिल्हा सचिव अतुल पाटील यांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर; या हातगाड्यांवर कारवाई करण्यात येईल. कारवाई करण्यासंदर्भात आपल्यावर कोणताही दबाव नाही. त्यामुळे ही कारवाई नक्की होईल, अशी प्रतिक्रिया प्रभाग समिती ‘आय`चे बाजार विभाग अधीक्षक राजीव पाटील यांनी दिली होती. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मंगळवार, 8 मार्च रोजी दुपारी बाजार विभाग अधीक्षक राजीव पाटील यांच्यासोबत संपर्क साधला असता अतिक्रमण विभागाने या स्टॉल्सधारकांना नोटीज बजावल्याचे ते म्हणाले.
नरवीर चिमाजी आप्पा मैदानाशेजारील नाल्यावर वसई-विरार महापालिकेने स्लॅब टाकला होता. ‘स्ट्रक्चरल ऑडिट`मध्ये हा स्लॅब अत्यंत धोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्याने या नाल्यावरील हातगाड्या हटविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजार विभागास पत्र दिलेले आहे. याशिवाय; सदर नाल्यावर महापालिकेने फलक लावून सामान्य नागरिकांना सावधानतेचा इशाराही दिलेला आहे. नाल्यावरील स्लॅबवर दिवसेंदिवस खाऊच्या गाड्यांचे तसेच तात्पुरत्या स्वरूपात होणारे बांधकाम मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यावर अतिरिक्त भार वाढत असल्याचे निरीक्षण बांधकाम विभागाने नोंदवले आहे. हा स्लॅब अतिरिक्त भार घेऊ शकत नसल्याने वाढत्या भारामुळे स्लॅब कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या नाल्यातून सांडपाण्याचा निचरा होत असल्याने मोठ्या प्रमाणात वायू तयार होत आहे.
नाल्यावरील हातगाड्यांवरील खाद्यापदार्थ तयार करण्याकरता गॅस शेगड््या पेटविण्यात येतात. शेगडी पेटविल्यानंतर निर्माण होणाऱ्या आगीशी या वायूचा संपर्क झाल्यास स्फोट होऊन जीवितहानी होण्याची भीतीही बांधकाम विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे या नाल्यावरील हातगाड्या त्वरित हटविण्यात याव्यात; तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना बांधकाम विभागाने केलेल्या आहेत. मात्र बाजार विभाग व अतिक्रमण विभागाच्या पत्राची दखलच घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) जिल्हा सचिव अतुल पाटील यांनी या प्रकरणात भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करत बाजार विभागाच्या अभियंत्यांविरोधात कारवाईची मागणी केलेली आहे.
What's Your Reaction?






