विरार : येत्या गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सामान्य प्रवाशांना आकारण्यात येणाऱ्या तिकीट दारांवर नियंत्रण ठेवून होणारी लूट थांबवण्यात यावी, अन्यथा; हजारो चाकरमान्यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडल्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने वसई प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.  

खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दराच्या दीड पट भाडे आकारणे बंधनकारक आहे. मात्र प्रादेशिक परिवहन अधिकारी व खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या या नियमाचे सर्रास उल्लंघन करताना दिसून आलेल्या आहेत. किंबहुना सामान्य प्रवाशांची जाणीवपूर्वक लूट करताना दिसून आलेल्या आहेत. ही गंभीर समस्या सातत्याने प्रवासी, प्रसार माध्यमे, जागरूक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी परिवहन अधिकाऱ्यांच्या निदर्शनासही आणून दिलेली आहे. मात्र खासगी ट्रॅव्हल्स बस मालकांकडून होणारी प्रवाशांची मनमानी लूट थांबवण्याकरता ‘भरारी पथकां`च्या माध्यमातून अपवादात्मकच कारवाई झालेली आहे. त्यात प्रादेशिक परिवहन विभागाची ठोस भूमिका आणि कार्यवाही दिसून आलेली नाही. तरी संबंधित विषयातील गांभीर्य आणि चाकरमान्यांची अत्यंत गरज लक्षात घेता खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना परिवहन कार्यालयाने निश्चित केलेल्या तिकीट दारांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच खसगी ट्रॅव्हल्स सुटत असलेल्या संबंधित ठिकाणी परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून प्रवाशांच्या माहितीकरिता परिवहनच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेल्या तिकीट दारांचे ठळक अक्षरांतील मोठे फलक दर्शनीय भागात लावण्यात यावेत. त्यानंतरही खसगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांना अवाजवी दर आकारल्यास, त्यांच्या सोबत हुज्जत घातल्यास, अरेरावी केल्यास, त्यांना प्रवास न करू दिल्यास किंवा त्यांना कोणताही आर्थिक अथवा मानसिक त्रास दिल्यास त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी प्रादेशिक परिवहन विभाग वसई यांच्याकडे केली आहे.   

वसई, विरार ते डहाणूपर्यंतच्या उपनगरातील चाकरमानी एप्रिल-मेची सुट्टी व होळी, महाशिवरात्री आणि गणेशोत्सव काळात विरारहून कोकण तसेच उर्वरित महाराष्ट्रात खासगी ट्रॅव्हल बसने मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. एसटीचा गोंधळी कारभार आणि सुनियोजित वाहतूक व्यवस्था नसल्याने एसटीने प्रवास करणे या चाकरमान्यांना शक्य होत नाही. त्याच वेळी रेल्वेनेही जाणे शक्य होत नाही. अशा वेळी गणेशोत्सव व इतर सणांवेळी विरार येथून सुटणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसचा पर्याय निवडावा लागतो. मात्र खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गरीब चाकरमान्यांची या काळात प्रचंड प्रमाणात आर्थिक लूटमार करतात. विशेषत: खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक आणि परिवहन विभागाचे काही संबंधित अधिकारी यांच्या संगनमतातून यापूर्वीही गणेशोत्सवापासून ते थेट दसरा, दिवाळी, शिमग्यापर्यंतच्या सणासुदीच्या काळात कोकणवासीयांची आर्थिक लूटमार होत आलेली आहे. अनेकदा त्यासाठी महागाई, वाढलेले डिझेल-पेट्रोल दर आणि रस्त्यांवर पडलेले खड्डे अशी कारणे पुढे केली जातात. आता पुन्हा एकदा प्रवाशांची गरज आणि हतबलता लक्षात घेऊन ‘सिझन`च्या नावाखाली तिकीट दरवाढ केली जाण्याची शक्यता असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी प्रादेशिक परिवहन विभाग वसई यांच्यासोबत पत्रव्यवहार केलेला आहे.