जोरदार शक्तीप्रदर्शन करत हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वसई - उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांची धावपळ सुरु असल्याचे दिसते. वसई मतदार संघातून आज २८ ऑक्टोबर रोजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केल्याचे दिसून आले. हितेंद्र ठाकूरांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत यावेळी बहुजन विकास आघाडीने आपले शक्तिप्रदर्शन केले. पिवळ्या झेंड्यांसह पिवळ्या वेशभूषेत हजारो कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
हितेंद्र ठाकुरांनी सकाळीच विरारचे ग्रामदैवत असलेल्या जीवदानी देवीचे आशीर्वाद घेऊन नंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ झाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशा, पिवळे झेंडे आणि पताके मिरवत ही रॅली काढण्यात आली. तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल करते वेळी ठाकूरांच्या सोबत, त्यांची पत्नी आणि माजी महापौर प्रविणा ठाकूर, ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक, वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम उपमहापौर सगीर डांगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक कोलासो हे यावेळी उपस्थित होते.
वसई विधानसभा मतदारसंघ हा हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००९ मध्ये ठाकुरांनी विधानसभा निवडणुक लढविली नव्हती त्यामुळे विद्यमान आमदार असणारे ठाकूर हे १९९० पासून वसई मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. वसईत ठाकूरांना वैयक्तिकरित्या मानणारा मोठा वर्ग असून आजही या मतदारसंघात त्यांची लोकप्रियता कायम आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकूरांना ९७ हजार २९१ मते मिळवत विवेक पंडित यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकूरांना १ लाख २ हजार ९५० मते मिळवून शिवसेनेच्या विजय पाटील यांचा पराभव केला होता.
What's Your Reaction?






