भाईंदर : पतीच्या घराचा ताबा मिळावा म्हणून दुसऱ्या पत्नीने थेट क्रेनच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावरील घरात शिरण्याचा धक्कादायक प्रकार मिरा रोडमधील 'अपना घर फेज-२' इमारतीत घडला आहे. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संबंधित महिला आणि क्रेन चालकाला ताब्यात घेतले आहे.

शारगुल खान या व्यक्तीने दोन विवाह केले असून, पहिली पत्नी रोशनी व दुसरी पत्नी शीतल अशी नावे आहेत. सदर घर रोशनीच्या नावावर आहे आणि तीच त्या घरात राहत होती. घराच्या ताब्यावरून तिघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.

बुधवारी शीतलने पूर्वनियोजित युक्तीने क्रेन बोलावून थेट तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून आत प्रवेश केला. घरात घुसल्यानंतर तिने रोशनीला मारहाण केली व जबरदस्तीने घराबाहेर हाकलले. रोशनीने रात्री काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलीस निरीक्षक महेश तोगडवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतलसह क्रेन चालक व मदतीस आलेल्या अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी शारगुलने एसी बसवण्यासाठी क्रेन मागवली होती, ही माहिती शीतलला होती. याच गोष्टीचा फायदा घेत तिने एसी लावायचे कारण देत क्रेन मागवली. मात्र एसी नसल्यानं चालकाने विचारणा केली असता, तिने पतीने घर उघडत नसल्यामुळे क्रेनमधून आत शिरत असल्याचे सांगितले.