द जर्नलिस्ट चा वसई-विरार महापालिकेला दणका: शवदाहिनींच्या चिमण्यांचे रंग बदलले

विरार:विराट नगर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीच्या चिमण्यांना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वसई-विरार महापालिकेने भारतीय ध्वजातील तिरंगी रंगांनी रंगवलेले होते. मात्र ही बाब ‘द जर्नलिस्ट डॉट इन`ने ‘वसई-विरार महापालिकेच्या बुद्धीला देवाज्ञा : स्मशानभूमींतील गॅस शवदाहिनींच्या चिमणीला तिरंग्याचा रंग!` या मथळ्याखालील बातमीतून वसई-विरारकरांच्या नजरेस आणून दिली होती. या कृत्यातून महापालिकेने राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याने वसई-विरारकरांनी पालिकेविरोधात संताप व्यक्त केला होता. या संतप्त भावनांनी डोळे उघडलेल्या पालिकेने अखेर या शवदाहिनींच्या धूर उत्सर्जन चिमण्यांचा रंग बदलला आहे. तिरंगी रंगांऐवजी त्या ठिकाणी अन्य रंग वापरून पालिकेने झाली चूक सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत एकूण 88 स्मशानभूमी आहेत. कोविड संक्रमण काळात वाढलेली मृत्यूंची संख्या; शिवाय मृतदेह जाळताना होणारे प्रदूषण रोखणे, वृक्षांचे संवर्धन व संरक्षण होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमां`तर्गत पालिकेने शहरातील स्मशानभूमींत गॅस शवदाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला होता.
या कार्यक्रमांतर्गत पालिकेला प्राप्त झालेल्या 32 कोटींच्या निधीतून आचोळेसह पाचूबंदर, नवघर, समेळपाडा आणि विरार स्मशानभूमींत गॅसशवदाहिन्या बसवण्यात आलेल्या होत्या. त्यासाठी प्रति गॅस शवदाहिनी 32,97,510 इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती. चार स्मशानभूमींतील गॅस शवदाहिनीकरता पालिकेने तब्बल 1 कोटी 31 लाख 90 हजार 040 रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर आणखी काही स्मशानभूमींतही गॅस शवदाहिनी बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे.
प्रत्यक्षात या गॅस शवदाहिनींचा वापर पालिका जाणीवपूर्वक करत नसल्याचे निरीक्षण आहे. शिवाय केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी संकल्प असलेल्या ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमा`ची पूर्ती होण्याऐवजी भ्रष्टाचार वाढीस उत्तेजन मिळत असल्याचे वसई-विरारकरांचे म्हणणे आहे.
त्यात विरार-विराट नगर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीच्या चिमण्यांना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पालिकेने तिरंग्याच्या रंगांनी रंगवलेले होते. याबाबतचे वृत्त ‘द जर्नलिस्ट डॉट इन`ने ‘वसई-विरार महापालिकेच्या बुद्धीला देवाज्ञा : स्मशानभूमींतील गॅस शवदाहिनींच्या चिमणीला तिरंग्याचा रंग!` या मथळ्याखालील बातमीतून वसई-विरारकरांच्या नजरेस आणून दिले होते. त्यावर वसई-विरार महापालिकेचा भावनिक आवेग व देशप्रेम साहजिक असले तरी ध्वजरंगांचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टिकोनातून पालिकेने किमान सौजन्य व देशभानही राखणे आवश्यक होते, अशा प्रतिक्रिया वसई-विरारकरांनी दिल्या होत्या. याच संतापातून पालिकेच्या या अलौकिक बुद्धिकौशल्यावर वसई-विरारकरांनी टीकेची झोड उठवलेली होती. या वृत्ताने जाग आलेल्या पालिकेने अखेर शवदाहिनींच्या धूर उत्सर्जन चिमण्यांचा रंग बदलला आहे. त्या ठिकाणी अन्य रंग वापरून झाली चूक सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे.
दरम्यान; वसई-विरार शहर महानगररपालिका स्मशानभूमींतील शवदहनासाठीचा जळाऊ लाकडांचा वापर थांबलेला नाही. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमा`ला महापालिकाच चूड लावतेय की काय? असा प्रश्न पर्यावरणप्रेमीं नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. 2023-24 या वर्षात वसई-विरार महानगरपालिकेने पुन्हा एकदा जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्यास वित्तीय व प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार या वर्षात चार हजार टक जळाऊ लाकडे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने 2 कोटी इतका खर्च अपेक्षित धरला आहे. मागील पाच वर्षांत पालिकेने अंदाजे 10 कोटी रुपये जळाऊ लाकडांवर खर्च केलेले आहेत.
What's Your Reaction?






