नागपुरात संघ आणि भाजपची समन्वय बैठक हरियाणानंतर महाराष्ट्रातही मदतीचा बुस्टर डोस

नागपूर : हरियाणा विधानसभा निवडणुकीत संघाच्या मदतीने विजयाची हॅट्रीक साधल्यानंतर आता भाजपला महाराष्ट्रातही संघाच्या मदतीची गरज भासते आहे. तर संघानेही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला मदतीचा बुस्टर डोस देण्याची तयारी केलीय. यातूनच शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी नागपुरातील रेशीमबाग येथे संघ आणि भाजप पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आलीय.
लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या सुमार कामगिरीमुळे चिंतीत झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षाला मदत आणि मार्गदर्शनातील सातत्य पूर्ववत केले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 6 जून रोजी संघ आणि फडणवीस यांच्यात नागपूरला बैठक झाली. त्यानंतर 23 जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ, प्रभादेवी परिसरातील यशवंत भवन या संघाच्या कार्यालयात सहसरकार्यवाह अरुण कुमार, अतुल लिमये यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी फडणवीस यांनी नागपूरच्या रेशीमबाग येथील संघ कार्यालयात जाऊन अरुण कुमार आणि अतुल लिमये यांच्याशी चर्चा केली. या भेटीनंतर 9 ऑगस्ट रोजी नागपुरातील बीआरए मुंडले शाळेच्या सभागृहात संघ आणि भाजप नेत्यांची बैठक झाली होती.
त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघ भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देखील मार्गदर्शन करणार आहे. त्यानुषंगाने शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी नागपूरच्या रेशीमबाग येथील संघ कार्यालयात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आलीय. संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्या उपस्थितीत सकाळी 10.40 वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीपूर्वी अतुल लिमये आणि सुमंत आमशेकर यांच्या उपस्थितीत संघाच्या विविध आयामामधील विभागस्तरीय टोळ्यांची सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत बैठक होणार आहे. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल असे सुत्रांनी सांगितले.
What's Your Reaction?






