नायगावमध्ये पाणी, रस्ते आणि गटार समस्यांवरून पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा

वसई – उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असताना नायगाव परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने शनिवारी नायगावमधील बजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले.
नायगाव पूर्व भागात महापालिकेचा पाणीपुरवठा अपुरा आणि अनियमित असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पाण्याची तीव्र गरज असताना देखील महापालिकेकडून नियोजनबद्ध पाणी देण्यात येत नसल्याने स्थानिक रहिवासी संतप्त आहेत. नागरिकांनी सांगितले की, “मोफत पाणी मिळावे म्हणून आम्ही मागणी करत आहोत, पण आज टँकरमधून पाणी विकत घ्यावे लागत आहे.”
महापालिकेकडून याआधी नायगावसाठी ५०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे नियोजन होते, मात्र ती अद्याप कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे पाणी समस्या अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर चेतन घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान महापालिकेचे उपायुक्त समीर भूमकर आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी १५ दिवसांच्या आत जलवाहिनीचे काम पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
याशिवाय, नायगाव पूर्व भागात दरवर्षी पावसाळ्यात खड्डेमय रस्ते व सांडपाण्याची समस्या निर्माण होते. गटार व्यवस्थेच्या अभावामुळे रस्त्यावर साचलेल्या घाणीच्या पाण्यातून नागरिकांना व शाळकरी मुलांना वाट काढावी लागते. त्यामुळे रस्ते आणि गटार कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणीही आंदोलकांनी यावेळी केली.
आंदोलकांनी पालिकेवर राजकीय भेदभावाचा आरोपही केला. बजन विकास आघाडीच्या काळात आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुढाकाराने मंजूर झालेली विविध विकासकामे सत्ताबदलानंतर थांबवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्हाला याआधी कधीच आंदोलन करावे लागले नव्हते, मात्र आता परिस्थिती अशी आहे की, लोकांच्या मूलभूत गरजांसाठीही रस्त्यावर उतरावे लागत आहे,” असे नागरिकांनी स्पष्ट केले.
नायगाव परिसरातील नागरिकांनी पालिकेकडून तातडीने उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?






