तब्बल 12 तासांनी मोकळा झाला रेल्वे ट्रॅक

तब्बल 12 तासांनी मोकळा झाला रेल्वे ट्रॅक

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या आंदोलकांनी तब्बल 12 तास रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केले. आंदोलकांना समजावण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ झाल्यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

बदलापूरमधील एका शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी करत सकाळी 6.30 वाजे पासून आंदोलन सुरू केलं. आंदोलकांनी यासाठी बदलापूर रेल्वे ट्रॅक अडवून ठेवला होता. आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन पोलिसांनी केले होते. तसेच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. आरोपीला आजच फाशी द्या या मागणीवर आंदोलक अडून बसले होते. त्यामुळे अखेर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना पांगवले. यावेळी आंदोलकांकडूनही पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडला. काही पोलिस यामध्ये जखमी झालेत. दरम्यान पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवरून जरी आंदोलकांना पांगवले असलं तरी आजूबाजूच्या परिसरातून हे आंदोलक दगडफेक करत होते. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचे निर्देशही फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.बदलापूर स्थानकावरील आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नेमके प्रकरण काय ?

बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये 1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपीची सफाई कर्मचारी नेमणूक झाली. त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अल्पवयीन मुलींसोबत 12 आणि 13 ऑगस्टला घृणास्पद कृत्य घडल्याचं एका मुलीने सांगितले. गुरूवार 14 ऑगस्ट रोजी पीडित 4 वर्षीय 2 मुलींपैकी एकीने तिच्या आजोबांकडे तिने आपल्या प्रायवेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं सांगितले, तेच तिने तिच्या आईकडेही सांगितले. घाबरलेल्या पालकांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनीही आपल्या मुलीनेही शाळेत जाण्यास नकार देत असल्याचे सांगितले. ज्यातून पुढे तिच्यासोबत असंच काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचे सांगितले. याप्रकरणी पिडीत मुलींचे पालक पोलिसात तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले होते. पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow