बदलापूर घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार - केसरकर.

मुंबई, 21 ऑगस्ट, (हिं.स.) — बदलापूर येथे शालेय अल्पवयीन मुलींबाबत झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेच्या संदर्भात त्या शाळेची आणि शाळेशी संबंधितांची चौकशी शिक्षण विभागाचे उपसंचालक व बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष करीत आहेत. या चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
श्री. केसरकर यांनी बदलापूर येथील घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि चौकशी केली. त्यानंतर मुंबईत परतल्यावर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
श्री. केसरकर म्हणाले, “विद्यार्थ्यांचे हित हेच माझे अंतिम ध्येय आहे. कोणत्याही विद्यार्थ्यावर झालेला अत्याचार सहन केला जाणार नाही. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जाणार आहे. संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल आणि डॉक्टर, पोलीस यांच्याकडून दिरंगाई झाली असल्यास त्यांच्यावर संबंधित विभागांमार्फत कठोर कारवाई करण्यात येईल.”
“उद्या बुधवारी सायंकाळी 4 वाजता पालकांना भेटायला पुन्हा बदलापूर येथे जाणार असून त्यावेळी पालकांनी आपले म्हणणे कळवावे. सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल,” असे श्री. केसरकर यांनी सांगितले. त्यांनी पीडितांच्या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही स्पष्ट केले.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, “राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘सखी सावित्री’ समिती स्थापन करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. 82 हजार शाळांमध्ये अशी समिती नेमण्यात आली आहे. ज्या शाळांमध्ये अशी समिती अद्याप स्थापन केलेली नाही, त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. लहान विद्यार्थिनींना अडचणीच्या प्रसंगी मोठ्या विद्यार्थिनींशी संवाद साधता यावा या दृष्टीने शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन केली जाईल.”
“विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या कार्यामध्ये ठराविक कालावधीनंतर बदल करणे, किमान चौथीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थिनींसाठी महिला कर्मचारी नियुक्त करणे, परिसरात पुरेसा प्रकाश राहील अशी व्यवस्था करणे, अलार्म बेलची सुविधा उपलब्ध करणे, स्वच्छतागृहांची देखभाल महिला कर्मचाऱ्यांमार्फत करणे, विद्यार्थिनींमध्ये लैंगिक संवेदनशीलतेबाबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून जागृती निर्माण करणे इत्यादी उपाययोजना करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता यांच्याबद्दलची माहिती सर्व शाळा शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयाशी जोडल्या जाईल,” असे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?






