बेताल वक्तव्ये भाजप कार्यकर्त्याला भोवली!कथित प्रवक्त्याला बविआ कार्यकर्त्यांनी फटकावले!

विरार : पक्षातील वरिष्ठांना खूश करण्याच्या प्रयत्नांत बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार तथा लोकनेते हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांच्यावर सोशल मीडियावर केलेली शेरेबाजी आणि बेताल वक्तव्ये वसईतील भाजप पदाधिकाऱ्याला भोवली आहेत. सततच्या अवमानकारक शेरेबाजीमुळे संतप्त झालेल्या बहुजन विकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्याला काल (3 सप्टेंबर ) दुपारी अखेर भररस्त्यात गाठून फटकावून काढले. प्रतीक चौधरी असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून, ते भाजपचे माजी बोईसर विधानसभा विस्तारक व सोशल मीडिया प्रवक्ते आहेत. विविध माध्यमांतून प्रतीक चौधरी हे आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात. अनेकदा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी केलेली कामे, राबवलेल्या योजना आणि त्यांची मते सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतात. दुसरीकडे; बहुजन विकास आघाडीला वसई-विरार शहराच्या अधोगतीला कारणीभूत ठरवत आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरोधातही ते आगपाखड करत असतात. ही टीका करत असताना अनेकदा त्यांचा संयम व तोल सुटलेला आहे. अनेकदा त्यांनी राजकीय भाष्य करण्याऐवजी त्यांच्या वैयक्तिक टीका केलेली होती. प्रतीक चौधरी यांच्या बेताल वक्तव्यांमुळे बहुजन विकास आघाडीच्या अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांची समजूत घातलेली होती. कुणाच्याही वैयक्ति जीवनावर टीका न करण्याबाबत त्यांना सूचित केलेले होते; मात्र या सगळ्याचा चौधरी यांच्यावर कोणताच असर झाला नाही. उलट त्यांच्या या कृत्यांत अधिकच भर पडलेली होती. मागील दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर त्यांनी आपल्या टीकेची धार अधिक ठेवल्याने व पुन्हा अर्वाच्य भाषेत आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांच्यावर शेरेबाजी केल्याने बहुजन विकास आघाडीचे वसईतील कार्यकर्ते स्वप्नील नर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी त्यांना वसईतील सागरशेत पेट्रोलपंपवर गाठले. चौधरी यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांचा त्यांना जाब विचारला. किंबहुना राजकीय टीका करण्याऐवजी वैयक्तिक शेरेबाजी करत असल्याच्या रागातून त्यांच्या मुस्कटात दोन थपडा लगावल्या. केलेल्या चुकीसाठी त्याच ठिकाणाहून दिलगिरी व्यक्त करण्यासही भाग पाडले. दरम्यान; प्रतीक चौधरी यांनी झाल्या कृत्याबद्दल सर्वांसमक्ष माफी मागितली व पुन्हा अशी चूक घडणार नाही, असे आश्वासन बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow