भाईंदर रेल्वे स्थानकातील मेहता पिता-पुत्र आत्महत्येचे गूढ उलगडले; समाजातील बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल

भाईंदर, — भाईंदर रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनखाली झोपून आत्महत्या केलेल्या वसईतील मेहता पिता-पुत्रांच्या आत्महत्येचे गूढ अखेर उलगडले आहे. जय मेहता यांनी अन्य धर्मातील मुलीशी लग्न केले होते, आणि हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे समाजात बदनामी होईल या भीतीने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे तपासात समोर आले आहे.
हरिष मेहता (६०) आणि त्यांचा मुलगा जय मेहता (३०) वसईच्या वसंत नगरी येथील रश्मी दिव्य हाऊस संकुलात राहत होते. जयचा काही महिन्यांपूर्वी एका दाक्षिणात्य मुलीशी प्रेमविवाह झाला होता, मात्र तो आधीच एका मुस्लिम तरुणीशी १० वर्षांपासून प्रेमसंबंधात होता आणि त्यांनी प्रतित्रापत्राद्वारे लग्नही केले होते. आपला समाज मुस्लिम तरुणीला स्वीकारणार नाही या भीतीने जयने दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न केले.
सोमवार ७ जुलै रोजी मेहता पिता-पुत्रांनी भाईंदर रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनखाली आत्महत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर आत्महत्येचे कारण समजून घेण्यासाठी चौकशी सुरू झाली. जयच्या पहिल्या पत्नीला त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल समजल्यानंतर तीने जयवर मोठा दबाव आणला, ज्यामुळे जयच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा तणाव निर्माण झाला होता.
वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयच्या मरोळ येथील कार्यालयात सापडलेल्या डायरीत जयने दोन्ही पत्नींना उद्देशून माफी मागणारे पत्र लिहिले होते. या पत्रात आणि जयच्या मोबाईल मधील कॉल्सचे तपशील (सीडीआर) यांमधून या आत्महत्येचे कारण उघड झाले आहे. वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले की, या प्रकरणात अद्याप कुणाची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
या धक्कादायक घटनाक्रमामुळे वसई आणि भाईंदर परिसरात खळबळ उडाली आहे.
What's Your Reaction?






