भाईंदर : सेप्टिक टॅंकमध्ये कामगाराचा गुदमरून मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

भाईंदर - भाईंदरमध्ये सेप्टिक टॅंक साफ करण्यासाठी उतरलेल्या एका कामगाराचा साफसफाई करत असताना जीव गुदमरल्याने मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या मजुराची प्रकृती चिंताजनक आहे. भाईंदर पूर्वीच्या गोल्डन वेस्ट परिसरात असणाऱ्या नक्षत्र सोसायटीच्या सेप्टिक टॅंक साफ करण्यासाठी दोन कामगार सेप्टिक टॅंकमध्ये उतरले होते तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली.
महिंद्रा कमळाकर पोंडकर (४७) असे मृत कामगाराचे नाव असून गणेश उत्तम आवटे (३५) यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सेप्टिक टॅंक साफ करण्यासाठी अंगाला दोरी बांधून कामगार टॅंकमध्ये उतरले होते. मात्र आत गेल्यावर दोघांचा जीव गुदमरू लागला यातच एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या कामगारावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेबद्दल आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या घटनेविषयी अधिक तपास नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज कोळी करत आहेत.
What's Your Reaction?






