कनिष्ठ अभियंता कौस्तुभ तामोरे यांना अखेर डच्चू!

कनिष्ठ अभियंता कौस्तुभ तामोरे यांना अखेर डच्चू!

विरार : वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘जी`मध्ये नियुक्त कनिष्ठ अभियंता कौस्तुभ संजय तामोरे यांना अखेर डच्चू देण्यात आला आहे. बेजबाबदार व बेशिस्त वर्तणुकीमुळे ‘अर्चना सर्व्हिसेस`च्या ठेक्यातून त्यांना कमी करण्यात यावे, असे आदेश सोमवार, 6 जानेवारी रोजी अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिले आहेत.

‘अर्चना सर्व्हिसेस`च्या विविध संवर्गातील मंजूर मनुष्यबळ पुरवठा ठेक्यामार्फत कौस्तुभ संजय तामोरे हे कनिष्ठ अभियंता (ठेका) या पदावर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘जी` अतिक्रमण-अनधिकृत बांधकाम विभागात कार्यरत होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तसेच नेमून दिलेल्या कामात ते हलगर्जी तसेच अक्षम्य निष्काळजी करत असल्याच्या तक्रारी वसई-विरार महापालिकेला प्राप्त झालेल्या होत्या. त्यांच्या वर्तणुकीमुळे महानगरपालिकेची प्रतिमा होत असल्याने तसेच त्यांचे वागणे अतिशय बेजबाबदारपणाचे असल्याने त्यांच्याकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्याने व त्याचा परिणाम महानगरपालिका कामकाज आणि प्रतिमेवर होत असल्याने त्यांना ठेक्यातून तात्काळ कमी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार; अर्चना सर्व्हिसेस यांनी कनिष्ठ अभियंता कौस्तुभ संजय तामोरे यांना ठेक्यातून कमी केल्याचे महापालिकेला कळविले आहे.

विशेष म्हणजे; भूमाफियांसोबत पबमधील एका रंगेल पार्टीत सामील होऊन महापालिकेची प्रतिमा मलिन केल्या प्रकरणी याआधी दोघा कनिष्ठ अभियंत्यांवर सोमवार, 4 मार्च 2024 रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती. वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ` पेल्हार विभागातील ठेका अभियंता भीम रेड्डी व चंदनसार समिती ‘सी प्रभागातील मिलिंद शिरसाट या दोघांचा वसईतील एका पबमधील पार्टीत भूमाफियांसोबत सामील असल्याचा व्हीडियो व्हायरल झाल्यानंतर पालिकेविरोधात प्रचंड झोड उठली होती. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी ही कार्यवाही केली होती. 

त्यानंतर; वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत जाहिरात होर्डिंग्जचे पाहणी अहवाल सादर करण्यात हलगर्जी व कामचुकारपणा केल्याने तुषार माळी या कनिष्ठ अभियंत्याला मंजूर ठेक्यातून कमी करण्यात आले होते. आस्थापना विभागाचे उपायुक्त सदानंद पुरव यांनी मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट यांना या संदर्भात 9 जुलै 2024 मध्ये आदेश दिले होते. 

2017 साली तब्बल नऊ कनिष्ठ (ठेका) अभियंत्यांनी वसई-विरार महापालिकेची अबू चव्हाट्यावर आणली होती.   ठेकेदाराच्या वाढदिवस पार्टीत रंगात आलेल्या तब्बल नऊ अभियंत्यांचा व्हीडियो 2017 साली व्हायरल झाला होता. त्या वेळी तत्कालिन पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी या सर्वांना घरचा रस्ता दाखवला होता. आता पुन्हा एकदा पालिकेची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या अभियंत्यांना निलंबित करून महापालिकेची इज्जत वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow