भाईंदर स्टेशनवर नव्या सरकत्या जिन्यांचा शुभारंभ; वाशांना मोठा दिलासा

भाईंदर स्टेशनवर नव्या सरकत्या जिन्यांचा शुभारंभ; वाशांना मोठा दिलासा

भाईंदर, 31 मे : भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस नव्याने उभारण्यात आलेले सरकते जिने (एस्केलेटर) अखेर वाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले असून, यामुळे वयोवृद्ध, दिव्यांग आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दररोज हजारो प्रवासी भाईंदर स्थानकावरून प्रवास करतात. विशेषतः वयोवृद्ध आणि अपंग प्रवाशांना पायऱ्या चढणे-उतरणे कठीण जात असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. लिफ्ट असूनही अपुरेपणामुळे अनेक सामान्य प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत होता. नव्या एस्केलेटरमुळे ही अडचण आता लवकरच संपणार असल्याची अपेक्षा आहे.

या सरकत्या जिन्याचे बांधकाम खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून करण्यात आले असल्याचा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

रेल्वे प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून डिजिटायझेशनला प्राधान्य दिले असून, भाईंदर स्थानकावरही त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. तिकीट घरात अनेक नवी तिकीट मशीन बसवण्यात आली आहेत. प्रवाशांना अधिक सुलभ सेवा मिळावी यासाठी एका खिडकीवर रोख रक्कम स्वीकारली जाते, तर उर्वरित खिडक्यांवर यूपीआयद्वारे व्यवहार होऊ शकतो.

प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे प्रशासनाकडून अधिक आधुनिक उपाययोजना केल्या जात असून, यामुळे स्टेशनवरील सेवा आणखी सुकर होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow