मालाडमध्ये साडेआठ लाखांच्या बनावट नोटा जप्त; दोघांना अटक

मुंबई – मालवणी पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि छपाईसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी संपत एंजपल्ली (४६) आणि रहिमपाशा शेख (३०) या दोघांना अटक करण्यात आली असून, हे दोघेही तेलंगणाचे रहिवासी आहेत.
मालवणी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मार्वे परिसरात सापळा लावण्यात आला. गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मार्वे समुद्रकिनारी एक निळ्या रंगाची संशयास्पद गाडी आढळली. पोलिसांनी गाडी अडवून झडती घेतली असता, ५०० रुपयांच्या एकूण १,७४० बनावट नोटा आणि नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य सापडले.
या टोळीचा सुत्रधार कोण आहे आणि बनावट नोटा कुठे तयार केल्या जात होत्या, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी कलम १७८, १८०, १८१, १८२, ३१८(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामागे आंतरराज्यीय टोळी असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पोलीस निरीक्षक जीवन भातुकले, तसेच तपास पथकातील अन्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
What's Your Reaction?






