भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, पाच जण बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल

भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षांची दिपाली मौर्य हिचा मृत्यू झाला असून, तिच्या कुटुंबातील पाच सदस्य गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भायंदर पश्चिमेतील बजरंग नगर येथील मौर्य कुटुंबाने बाहेरून अन्न विकत घेतले होते, जे त्यांनी घरच्या अन्नासोबत रात्रीच्या जेवणात सेवन केले. त्यानंतर सर्व कुटुंबीय अचानक बेशुद्ध झाले.
मृत दिपाली मौर्य हिच्या वडिलांचे नाव रमेश मौर्य, आई नीलम, बहिणी छात (८) आणि अनामिका (६) तसेच काकाचे नाव राजकुमार असून, सर्वजण सध्या रुग्णालयात उपचाराधीन आहेत. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
ही घटना उघडकीस आली तेव्हा त्यांच्या गावाकडील नातेवाईकांनी अनेक वेळा फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्यामुळे, जवळच राहणाऱ्या एका नातेवाइकाने त्यांच्या घरी जाऊन पाहिलं. त्याने जोरजोरात दरवाजा वाजवला, परंतु आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. घरात प्रवेश करताच सर्वजण जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच भायंदर पश्चिम पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी नमूद केलं की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातील.
ही घटना परिसरात भीतीचं आणि दु:खाचं वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. नागरिकांना अशा घटना टाळण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित अन्न सेवन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
What's Your Reaction?






