मतांचा अपमान करणारांना धडा शिकवा, महाराष्ट्राचं भविष्य तुमच्या हाती : राज ठाकरे

मुंबई : दसऱ्याच्या निमित्ताने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून राज्यातील मतदारांशी संवाद साधत सत्ताधारी नेत्यांवर तीव्र टीका केली. ठाकरे यांनी जनतेला संबोधताना मतांचा अपमान करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याचं आवाहन केलं. ठाकरे म्हणाले, की दरवर्षी तुम्ही राजकारण्यांच्या भूलथापा ऐकता आणि त्यांना निवडून देता, पण यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. या निवडणुकीत मतदारांनी परिवर्तन घडवून आणायला हवं. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची केवळ बाह्य प्रगतीवर नव्हे तर सामाजिक आणि वैचारिक विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली. फ्लायओव्हर, रस्ते किंवा गॅझेट्सच्या वाढीला विकास म्हणणं चुकीचं आहे, असा ठाम दावा करत त्यांनी खऱ्या परिवर्तनाच्या संकल्पनेवर जोर दिला. राज ठाकरे यांनी मतदारांना जागृत करत सांगितलं की, शस्त्रं खाली ठेऊ नका, मतदानाच्या दिवशी तुमचं मत या सत्ताधाऱ्यांवर रोखून त्यांचा पराभव करा. जात-पात, नाते, मैत्रीच्या भावनांनी राज्य उभं राहात नाही. मत म्हणजे तुमचं शस्त्र आहे, ते योग्य वेळी वापरा. ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या स्वप्नातील राज्य निर्माण करण्याचा मानस जाहीर केला. एकदा संधी द्या, जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र घडवतो. त्यांनी विशेषत: तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांना ही क्रांतीची वेळ असल्याचं सांगितलं. या निवडणुकीत तुम्ही क्रांती केली पाहिजे, हा खरा संधीचा क्षण आहे. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, त्यांचा वचपा काढण्याची ही वेळ आहे,असे ही ते म्हणाले.
What's Your Reaction?






