मासेमारीचा हंगाम सुरू होताच उधाणाच्या भरतीने जाळ्यांचे लाखोंचे नुकसान
वसई: नारळीपौर्णिमेनंतर मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे.मात्र मासेमारीचा हंगाम सुरू होताच समुद्रात मोठे उधाण आले होते. या उधाण भरतीच्या लाटांचा तडाखा बसून मच्छीमारांची जाळी फाटली आहेत.त्यामुळे मच्छीमार बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.नरळीपौर्णिमेला दर्या राजाला मानाचा नारळ अर्पण केल्यानंतर मच्छीमारांच्या बोटी मासेमारीसाठी रवाना होऊ लागल्या आहेत. वसई विरारच्या अर्नाळा, वसई, नायगाव, पाचूबंदर, किल्लाबंदर या भागातील मच्छीमारांच्या आठशेहून अधिक बोटी आहेत.हंगाम सुरू झाल्याने आता बोटी मासेमारी जाण्यास सुरवात झाली आहे. मासेमारीसाठी खोल समुद्रात मच्छीमारांनी जाळी टाकली होती. मात्र समुद्राला मोठे उधाण आले होते. त्यामुळे लाटांचा प्रवाह अधिक जोराचा होता.
या लाटांच्या तडाख्याने जाळी फाटून मोठे नुकसान झाले असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले आहे.एक जाळे साधारणपणे ५० ते ६० हजार रुपये किंमतीचे आहे. पहिल्याच फेरीला जाळ्यांचे नुकसान झाले. आता समुद्र किनारी बसून जाळी विणण्याचे काम सुरू केले असल्याचे मच्छीमार हरेश्वर तांडेल यांनी सांगितले आहे.मागील वर्षी समुद्रात मासळीचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. त्यामुळे मत्स्यदुष्काळाचा सामना या बांधवांना करावा लागला होता. याशिवाय बराच काळ मासेमारी बंद ठेवावी लागली होती.यंदाचा हंगाम तरी चांगला जाईल अशी आशा आहे. परंतु सुरवातीलाच लाखोंचे नुकसान झाल्याने मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली आहे
जाळी विणण्याचे काम सुरू
मासेमारीचा हंगाम सुरू होतो तेव्हा सुरवातीला चांगल्या प्रमाणात मासळी जाळ्यात अडकते.मात्र सुरवातीलाचा लाटांच्या तडाख्याने जाळी फाटून गेल्याने ऐन मासेमारी करण्याच्याहंगामात पुन्हा एकदा जाळी नव्याने विणण्याचे काम करावे लागत आहे. सद्यस्थितीत अर्नाळा येथील समुद्र किनारी बसून मोठ्या संख्येने मच्छीमार जाळी विणण्याच्या कामात गुंतले आहेत.
नुकताच भरपाई द्या
जेव्हा अवकाळी पाऊस पडून शेतीचे व अन्य नुकसान होते तेव्हा शासन स्तरावरून मदत दिली जाते. मात्र मच्छीमारांची जाळी फाटून लाखोंचे नुकसान होते तेव्हा मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असते. जाळ्यांचे होणारे नुकसान हे लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना सुद्धा शासन स्तरांवरून मदत मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निनाद पाटील यांनी केली आहे.
What's Your Reaction?






