वसई-विरारमध्ये पाच दिवसीय गणपतीचे भावपूर्ण विसर्जन:६६ टक्के विसर्जन महापालिकेच्या कृत्रिम तलावात

वसई-विरारमध्ये पाच दिवसीय गणपतीचे भावपूर्ण विसर्जन:६६ टक्के विसर्जन महापालिकेच्या कृत्रिम तलावात

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांना गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी शहरात ५ दिवसीय गणपती विसर्जनात एकूण ७ हजार ५०८ गणेश मूर्तीचे विसर्जन झाले, त्यापैकी ४ हजार ९८१ गणेश मूर्तीचे म्हणजेच ६६.३४ टक्के विसर्जन कृत्रिम तलावात झाले.

महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेली जनजागृती, ठिकठिकाणी उभारलेले १०५ कृत्रिम तलाव, विसर्जनासाठी केलेल्या सोयी सुविधा यामुळे गणेश भक्तांचा कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा कल वाढत आहे.

वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या संकल्पनेतून मागील २ वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने केलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. बुधवारी वसई-विरार शहरात बुधवारी ५ दिवसीय एकूण विसर्जनापैकी कृत्रिम तलावात ४ हजार ८७१ घरगुती गणेशमूर्तीचे तर ११० सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन झाले. उर्वरित २ हजार ५२७ मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक तलाव आणि समुद्रात झाले.

शहरातील पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाकरिता, प्रत्येक कृत्रिम तलाव विसर्जनस्थळी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप, फिरते शौचालय उभारून दिवाबत्तींची सोय करण्यात आली होती. तसेच पालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक गणेशभक्तांच्या मदतीसाठी तैनात होते. प्रत्येक प्रभागातील सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी वर्ग आपापल्या प्रभागातील विसर्जन स्थळावर हजर राहून विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. विसर्जन शांततेत संप्पन्न झाले आणि गणेशभक्तांची कुठलीही गैरसोय झाली नाही. तसेच यंदा विसर्जनात शाडू मातीच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. यामुळे नैसर्गिक तलावांचे प्रदूषण रोखले गेले आहे.

 महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी विसर्जन नियोजनाची प्रत्यक्ष पाहाणी केली आणि गणेशभक्तांशी संवाद साधला. तसेच नियोजनाबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

कोट

वसई-विरारमधील सुजाण नागरिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागरुक आणि संवेदनशील असल्याने कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाचे प्रमाण वाढत आहे. गणेश भक्तांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतो. येणाऱ्या सात दिवसीय, अनंत चतुर्दशी आदी विसर्जनावेळीदेखील नागरिकांनी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे आणि निसर्गाची हानी टाळावी.

- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका


- ⁠पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन २०२४

कृत्रिम तलाव

घरगुती - ४ हजार ८७१

सार्वजनिक ११०

एकूण - ४ हजार ९८१

नैसर्गिक तलाव व जेटी

घरगुती - २ हजार २०७

सार्वजनिक ३२०

एकूण २ हजार ५२७

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow