शुभेच्छा नको पण बॅनर्स आवर.. शहराच्या विद्रूपीकरणात वाढ.

वसई:मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर बॅनर्स फ्लेक्स यावरती बंदी आणलेली असतानाही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी बेकायदेशीर बॅनर्स फ्लेक्स यांनी धुमाकूळ घातलेला आहे सध्या गणेशोत्सव सुरू आहे त्यामुळे विविध राजकीय पक्ष शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स चा वापर करतात. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सरळ अपमान करून शहराचा विदृपीकरण झालेलं आहे. तरीही, पालिका प्रशासन ढिम्म आहे.
यातील बहुतांश बॅनर्स कमानी या बेकायदेशीर आहेत. त्यामुळे मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. असे असतानाही पालिका प्रशासन अशा बॅनर्सवर कारवाई करण्यास तयार नाहीत.
एकूण परिस्थिती पाहता गणेश भक्तांना अशा राजकीय पक्षांसाठी 'शुभेच्छा नको परंतु बॅनर्स आवर' असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. पालिकेचे अतिक्रमण विभाग कायम राजकीय पक्षांच्या बॅनर्सना पाठीशी घालत आलेले आहेत. त्यामुळे शहराचं विद्रूपीकरण मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त झालेले आहे. एकीकडे पालिका आयुक्त अनिल कुमार पवार हे पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचं आव्हान करतात. वसईतील आमदार खासदार व इतर लोकप्रतिनिधी अशाच स्वरूपाचे पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे समर्थन करताना दिसतात परंतु, वस्तुस्थितीमध्ये अशा शुभेच्छा बॅनर्सवर आवर घालण्यात पालिका प्रशासन व राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते यांना अपयश आलेलं आहे.
लाईटचे पोल, झाडे, इमारती , रस्ते पदपथ अशा सर्वच ठिकाणी शुभेच्छा व जाहिरातीचे मोठे बॅनर्स दिसून येतात. अशा राजकीय बॅनर्सना उघड उघड पालिका प्रशासन समर्थन देत असल्याचे चित्र आहे. विविध प्रभाग समित्यांमध्ये फेरीवाला पथक अतिक्रमण विभाग, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांना हे विद्रूपीकरण दिसत नाही का? असा सर्वसामान्य नागरिकांचा सवाल आहे. यावर्षी बॅनरबाजीच्या या विद्रूपिकरणाने वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये कळस गाठलेला आहे. यावर फौजदारी कारवाई करून विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होणे अपेक्षित आहे. तसे होताना दिसत नाही.
What's Your Reaction?






