मिरा-भाईंदर : मित्राची कोयत्याने निर्घृण हत्या; आरोपी पुण्यातून अटकेत

अश्लील व्हिडिओवरून ब्लॅकमेल करत असल्याचा संशय; भायंदर पश्चिमेतील मुर्दा खाडी परिसरातील घटना

मिरा-भाईंदर : मित्राची कोयत्याने निर्घृण हत्या; आरोपी पुण्यातून अटकेत

भायंदर, १४ जून २०२५: भायंदर पश्चिमेतील मुर्दा खाडी परिसरात एक खळबळजनक आणि थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. ३६ वर्षीय संजय शर्मा याने आपल्या ४६ वर्षीय जुना मित्र अनीस नबी याची १० जूनच्या रात्री कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला होता. भायंदर पोलिसांनी संजयला पुण्यातून अटक केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संजय शर्मा हा पेशाने पेंटर असून मुर्दा खाडी परिसरात एका चाळीत भाड्याने राहतो. त्याचा जुना मित्र अनीस नबी ८ जून रोजी काही दिवसांसाठी त्याच्याकडे राहण्यासाठी आला होता. १० जूनच्या रात्री अनीसच्या मोबाईलमध्ये संजयच्या पत्नीबरोबरचे अश्लील व्हिडिओ असल्याचे समजल्याने, त्याने संजयला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

वाद विकोपाला गेल्यानंतर संजयने घरातील कोयत्याने अनीसवर गळा व पोटावर सपासप वार करत त्याची जागीच हत्या केली. घटना घडत असताना घरमालकीण घरात आली आणि आरडाओरड करू लागली. त्यानंतर संजय कोयता घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.

घरमालकीणने सांगितले की, “मी आत आले आणि काय चाललंय हे पाहिलं तेव्हा संजय कोयता घेऊन अनीसवर वार करत होता. मी आरडाओरड करताच तो लगेच पळून गेला.”

घटनेची माहिती मिळताच भायंदर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फूटेज, आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.

गुन्हे शाखा झोन-१ च्या पथकाने पुण्यातून आरोपी संजय शर्माला अटक केली. पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेने समांतर तपासही सुरू केला होता.

पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, दोघांवर यापूर्वीही हत्येचे गुन्हे दाखल आहेत. संजय आणि अनीस यांची ओळख आधारवाडी तुरुंगात झाली होती. नंतर संजयने अनीसला नाशिक तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मदत केली होती.

पोलिसांचा तपास सुरू असून संजयला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow