मिरा-भाईंदर: 100 दिवसांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांचा गौरव; पण हद्दीत जुगार, गुटखा व हुक्का पार्लर सुरूच!

मिरा-भाईंदर: 100 दिवसांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांचा गौरव; पण हद्दीत जुगार, गुटखा व हुक्का पार्लर सुरूच!

नालासोपारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत मिरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांचा सन्मान करण्यात आला आहे. आयुक्तालयास 100 पैकी 84.57 गुण प्राप्त झाले असून, कार्यालयीन सुधारणा, सुविधा आणि नागरी तक्रारींच्या निवारणासाठी राबवलेले उपक्रम यामुळे त्यांची निवड झाली.

मात्र, दुसऱ्या बाजूला या पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात जुगार, गुटखा विक्री आणि हुक्का पार्लर यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

एका प्रेक्षकाने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला पाठवलेल्या व्हिडिओमध्ये नालासोपारा पूर्वेतील आचोळे स्मशानभूमीजवळ एका दुकानात हुक्का पार्लर निर्भीडपणे सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येते. येथे तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, हुक्का ओढण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.

विशेष म्हणजे, नालासोपारा स्थानकाजवळ एका राजकीय पक्षाच्या दुकानात देखील हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

नागरिकांनी पोलिसांवर आणि स्थानिक प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हे धंदे त्यांच्या डोळ्यादेखत चालत असल्याचे सांगितले आहे. वरवर कायदा आणि सुव्यवस्थेची प्रशंसा केली जात असली तरी प्रत्यक्षात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत 7 कलमी सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यात कार्यालयीन सुविधा, स्वच्छता, नागरिकांच्या तक्रारी निवारण, गुंतवणूक प्रोत्साहन, संकेतस्थळ सुधारणा, सायबर ऑडिट आदींचा समावेश होता.

मिरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने या उपक्रमांत भाग घेऊन उल्लेखनीय सुधारणा केल्या. मात्र, या पार्श्वभूमीवर खुल्या रस्त्यावर सुरू असलेले अवैध व्यवसाय यशाचे गालबोट ठरत आहेत.

पोलीस आयुक्तालयाचा गौरव झाला असला तरी हद्दीतील वाढते गैरकृत्य आणि राजकीय आश्रयाने चालणारे हुक्का पार्लर यावर त्वरित कारवाई होणार का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा आहेत की कायदा सर्वांवर सारखा लागू व्हावा आणि गौरवाबरोबर उत्तरदायित्वही ठामपणे पाळले जावे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow