मुंबई महापालिकेला राखीव पाणीसाठ्याची राज्य सरकारकडून मंजुरी – पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता

मुंबई महापालिकेला राखीव पाणीसाठ्याची राज्य सरकारकडून मंजुरी – पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता

मुंबई :मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पाणी कपातीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने केलेली राखीव पाणीसाठ्याची मागणी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांत पाणीकपातीपासून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या मागणीनुसार उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दलिटर आणि भातसा धरणातून १ लाख १३ हजार दलिटर इतका पाणीसाठा राखीव स्वरूपात उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून फक्त ३१ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलै अखेरपर्यंत पुरवावा लागणार असल्यामुळे महापालिकेने आधीच खबरदारी घेत राखीव साठ्याचा प्रस्ताव मार्च महिन्यात सादर केला होता.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राखीव साठ्याचा वापर आवश्यकतेनुसारच केला जाणार आहे. जर पावसाचे आगमन लांबले, तरच या पाणीसाठ्याचा वापर सुरू केला जाईल. याशिवाय, वापरलेल्या पाण्याचा मोबदला राज्य शासनाला दिला जाणार असून, वापराच्या प्रमाणानुसार हिशेब केला जाईल.

गेल्यावर्षी जून महिन्यात पाणीसाठा ५ टक्यांपर्यंत खालावल्याने, महापालिकेला राखीव साठ्याचा वापर करावा लागला होता. त्यावेळी भातसा धरणातून १.३७ लाख दलिटर आणि उर्ध्व वैतरणा धरणातून ९१,१३० दलिटर पाण्याची मागणी करण्यात आली होती. यंदाही अशीच तयारी ठेवण्यात आली आहे.

सध्या मुंबईतील काही भागांमध्ये पाण्याचा दाब कमी झाला असून, काही ठिकाणी पाणीपुरवठा देखील मर्यादित वेळेत केला जात आहे. मात्र, राखीव पाणीसाठ्याच्या मंजुरीमुळे तातडीचा वापर करावा लागल्यास पुरेसा साठा उपलब्ध असणार आहे.

महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यंदाही पाणी टंचाईची वेळ ओढवू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, गरज पडल्यासच राखीव साठ्याचा वापर करण्यात येईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow