मुसळधार पावसामुळे वसई विरार जलमय
वसई - बुधवारी संध्याकाळपासून पडणार्या पावसाने वसई विरार शहर जलमय झाले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यांपासून सखल भागात पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे वाहतूक खोळंबली होती आणि घरी मुंबईहून परतणार्या नागरिकांचे हाल झाले होते. वसई विरारमध्ये बुधवारी दिवसभर पावसाची ये-जा होती. तुरळक सरी कोसळत होत्या. मात्र संध्याकाळपासून ढगांच्या जोरदार गडगडाटांसह मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसाची संसतधार सुरू असल्याने शहाराच्या ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरवात झाली. शहरातील मुख्य रस्ते देखील पाण्याखाली गेले होते. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहने पाण्यात बंद पडत होती. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने पाण्यात वाहून गेल्याचे दिसून येत होती. वसईतील माणिकपूर रस्ता, दिवाणमान, शंभर फुटी रस्ता, दिनदयाल नगर, चुळणे गाव परिसर, अंबाडी रोड परिसरात असलेल्या सी कॉलनी, चुळणा, सागरशेत, वसंत नगरी, एव्हर शाईन विरार मधील विवा महाविद्यालय परिसर, वर्तक वॉर्ड, गावठण, नालासोपारा येथील तुळींज, गाला नगर, आचोळे रोड, द्वारका हॉटेल परिसर व नायगाव मधील टीवरी रस्ता, स्टार सिटी, वाकीपाडा अशा मुख्य रस्त्यासह अनेक शहरांतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. या मुसळधार पावसामुळे संध्याकाळी मुंबईहून कामावरून परतणार्या वसईकरांचे चांगलेच हाल झाले.
What's Your Reaction?






