रेसिंगसाठी मोटारसायकल चोरी : वालीव पोलिसांकडून दोन आरोपींना अटक

रेसिंगसाठी मोटारसायकल चोरी : वालीव पोलिसांकडून दोन आरोपींना अटक

वसई, २४ एप्रिल : वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरात वाहनचोरीच्या वाढत्या घटनांमध्ये मोठी कारवाई करत वालीव पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघा सराईत आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून एकूण ७ मोटारसायकली तसेच विविध दुचाकीचे सुटे भाग जप्त करण्यात आले असून, एकूण मालाची किंमत ८ लाख २१ हजार रुपये इतकी आहे.

सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे साहील अली शेख (२०) आणि अरशान जाकीर सौदागर (२२) अशी असून, ते मालवणी (मुंबई) येथून अटक करण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही मंडळी रेसिंग करण्यासाठी मोटारसायकली चोरत असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांनी दिली.

३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर, तपासात यश

वालीव पोलीस ठाणे हद्दीतील गीता उद्योग नगर भागातून नुकतीच एका दुचाकीची चोरी झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. या तपासात जवळपास ३00 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दोघा आरोपींपर्यंत पोलीस पोहोचू शकले.

इतर ठिकाणचे गुन्हेही उघड

या प्रकरणात एकूण चार आरोपींचा समावेश असून सध्या दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक आरोपींनी वालीव, भांडुप, दहिसर आणि पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोऱ्यांची कबुली दिली आहे.

कारवाईचे नेतृत्व

सदर कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरखनाथ जैद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, विनायक राऊत, बाळु कुटे, सचिन लांडगे आणि केतन गोडसे यांनी तपासात मोलाची भूमिका बजावली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow