वसईच्या व्यवस्थेचा बळी ठरलेला आजगावकर स्मृतीस्तंभ दुर्लक्षीत

वसई : वसईच्या वीज आंदोलनात बळी गेलेल्या तरुणाच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेला 'आजगावकर चौक' नूतनीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. काही वर्षांपूर्वी महावितरणच्या बेजबाबदार पणामुळे सदर तरुणाचा बळी गेला होता. विशेष म्हणजे आता महावितरणच्याच महाकाय केबल्सनी हा चौक झाकोळला गेला आहे.
अधिक माहितीनुसार, १९८४ साली तात्कालीन एम. एस. ई. बी. आताच्या महावितरण कंपनीच्या गलाथान कारभारामुळे वसई पारनाका परिसर विजे अभावी त्रस्त असायचा. एका वैद्यकीय शस्त्रक्रिये दरम्यान वीज खंडित झाल्याचे कारण विचारण्यास गेलेल्या विजय आजगावकर या निष्पाप तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला होता.
या घटने नंतर संतप्त नागरिकांनी पारनाका पोलीस चौकीसह, महावितरण कार्यालय आगीत भस्मसात केले होते. वीज वितरणातल्या समस्येबाबत या काळात आंदोलने झाली होती. व्यवस्थेचा बळी ठरलेला आजगावकर वसईकरांच्या कायम स्मरणात राहावा तसेच नागरिकांना सोयी सुविधा पुरवणाऱ्या शासकीय संस्थांनी या घटनेतून योग्य तो बोध घेऊन सेवा सुधरवावी याकरीता सदर स्मृतीस्तंभ वसई गांव बस स्थानका समोर उभारला होता.
हा स्मृतिस्तंभच सध्या दयनीय अवस्थेत आहे. विशेष म्हणजे महावितरणच्याच मोठ्या वीज वाहक केबल्सनी हा स्तंभ झाकोळला गेला आहे. व्यवस्थेला हा स्मृतीस्तंभ कायम दृष्टीस पडायला हवा याच उद्देशाने उभारण्यात आला होता मात्र, महावितरण येथील केबल हटवून, महानगरपालिका प्रशासन या स्मृतीस्तंभाची डागडुजी करू शकेल का ? असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
What's Your Reaction?






