वसईतील ६९ गावांची पाणीपुरवठा योजना : २९ गावांना पाणीपुरवठा कधी ?
मागील १३ वर्षांपासून पाणी पुरवठा योजना गावापर्यंत पोहोचली नाही. जलकुंभ, जुन्या जलवाहिन्या अनेक वर्षांपासून वापराविना नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे अमृत दोनचे काम पूर्ण झाल्यावर उर्वरित गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

वसई - वसई-विरार परिसरात ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेतून १३ वर्षांपूर्वी गावांना पाण्याचे वितरण केले जाणार होते. मात्र अजूनही ही योजना पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. आजही वसईतील २९ गावांना पाणीपुरवठा होत नसून यामुळे गावकऱ्यांना पालिकेच्या पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे इतकी वर्षे होऊनही आपल्याला पाणी का दिले जात नाही असा प्रश्न आता गावकरी विचारत आहेत.
या प्रश्नाबाबत चार महिन्यांपूर्वी शिवेसनेचे पालघर जिल्हा सहसचिव हरिश्चंद्र पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. यावर पालिकेने उत्तर द्यावे असे पत्र मुख्यमंत्री सचिवालय कक्षातून प्राप्त झाले आहे. यावर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाटील यांना उत्तर दिले आहे.
अमृत दोन अंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजना बळकटीकरण आणि विस्तारीकरण अंतर्गत पालिका क्षेत्रात ग्रामीण भागासह संपूर्ण क्षेत्रात आवश्यक जलवाहिन्या उभारण्याची कामे प्रस्तावित केली आहेत. या योजने अंतर्गत मंजूर ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आलेले आहेत. निर्मळ गाव व परिसरात या दृष्टीने पालिकेकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
मागील १३ वर्षांपासून पाणी पुरवठा योजना गावापर्यंत पोहोचली नाही. जलकुंभ, जुन्या जलवाहिन्या अनेक वर्षांपासून वापराविना नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे अमृत दोनचे काम पूर्ण झाल्यावर उर्वरित गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पपालिकेत समाविष्ट असलेल्या गावांच्या पाणीपुरवठ्याविषयी पालिकेने यापूर्वीच जलकुंभ आणि नवीन जलवाहिन्या अंथरण्याच्या दृष्टीने काम सुरु केले आहे. तसेच २६ गावांचा पाणीपुरवठा यापूर्वीच सुरु करण्यात आलेला आहे. काही गावांमध्ये असलेल्या जलकुंभाची चाचणी करून पाणीपुरवठा सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे. - सुरेंद्र ठाकरे, उपअभियंता, वसई-विरार शहर महानगरपालिका
एमएमआरडीएकडून पालिकेला सूर्या योजनेतून अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. शहरातील विविध भागातील जलवाहिन्या आणि जलकुंभाची जलदाब चाचणी करण्याची कामे सुरु असून ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेतील पालिकेत समाविष्ट ५५ पैकी २६ गावांना यापूर्वीच पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. उर्वरित सर्व गावांमध्ये नव्याने जलवाहिन्या अंथरण्याची व दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यांनतर टप्य्याटप्याने पाणीपुरवठा केला जाईल असेही पालिकेने आपल्या पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे मात्र, आता पालिकेने काम पूर्ण करून पाणी पुरवठ्याचे वितरण करावे अशी मागणी हरिश्चंद्र पाटील यांनी केली आहे.
What's Your Reaction?






