वसई-विरार महापालिकेचे भूमफियांविरोधात मोहनास्र! सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांच्या नेतृत्त्वात बहुचर्चित आयशा कम्पाउंडचा सुपडा साफ

विरार : वसई-कामण येथील बहुचर्चित आयशा कम्पाउंड सर्व्हे क्रमांक 176 मधील तब्बल सात गाळे (60 हजार चौरस फूट) जमीनदोस्त करून सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये भूमाफियांसाठी कर्दनकाळ ठरले आहेत. वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘जी`अंतर्गत ससूनवघर व कामण येथे गुरुवार, 19 डिसेंबर रोजी सकाळी ही नियोजित कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी वसई-विरार महापालिकेने भूमाफियांविरोधात ‘मोहनास्र` वापरले. सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांच्या नेतृत्त्वातील या निष्कासन मोहिमेत एकूण 85 हजार चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे.
वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘जी` व ‘एफ` हे प्रभाग अनधिकृत बांधकामांसाठी कुप्रसिद्ध आहेत. खान कम्पाउंड, उमर कम्पाऊंड, मायकल कम्पाऊंड, रिचार्ड कम्पाउंड, आयशा कम्पाउंड, संतोष भुवन अशा नवीन अनधिकृत वसाहती या प्रभागांत वसल्या आहेत. या अनधिकृत बांधकामांचा ताण वसईतील अन्य भागांच्या सोयीसुविधांवर पडत आहे. शिवाय यातून गुन्हेगारीलाही उत्तेजन मिळत असल्याने व वसई-विरार महापालिकेचा कर मोठ्या प्रमाणात बुडत असल्याने ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती. परंतु भूमाफियांसोबतच्या आर्थिक हितसंबंधांमुळे या बांधकामांवर कारवाई करण्यात पालिका अधिकाऱ्यांना मर्यादा येत होत्या. मात्र सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांनी या मर्यादा ओलांडत भूमाफियांचा सुपडा साफ केला आहे.
मुळातच निर्भिड व कामाप्रति निष्ठा जपणाऱ्या मोहन संख्ये यांनी भूमफियांच्या राजकीय संबंधांना चूड लावण्याची हिंमत दाखवली आहे. हजारो चौरस फुटांची अनधिकृत बांधकामे निष्कासित करून भूमफियांसाठी पुन्हा एकदा ते कर्दनकाळ ठरले आहेत. आजच्या बेधडक कारवाईत सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांनी गाव मौजे ससूनवघर सर्व्हे क्रमांक 175 येथील अंदाजित 25 हजार चौरस फुटांचे तीन गाळे निष्कासित केले. तर गाव मौजे ससूनवघर सर्व्हे क्रमांक 176 येथील अंदाजित 60 हजार चौरस फुटांचे सात गाळे जमीनदोस्त केले आहेत. या मोहिमेत एकूण 85 हजार चौरस फुटांचे पत्रावीट व अतिक्रमण हटविण्याची कौतुकास्पद कामगिरी सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांनी केली आहे.
विशेष म्हणजे; वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘जी`चा पदभार सहाय्यक आयुक्त नीता कोरे यांच्याकडे आहे. सध्या नीता कोरे या सुट्टीवर असल्याने हा पदभार अवघ्या तीन दिवसांसाठी मोहन संख्ये यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलेला आहे. त्यातील पहिल्याच दिवशी ही अविश्वसनीय कामगिरी करून मोहन संख्ये वसई-विरारकरांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान` असलेल्या मोहन संख्ये यांनी याआधीही आपली प्रतिभा दाखवलेली आहे.
वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार, प्रभारी आयुक्त रमेश मनाळे व अतिरिक्त आयुक्त (दक्षिण) संजय हेरवाडे आणि अतिक्रमण विभागाचे उपायुक्त दीपक सावंत यांच्या आदेशानुसार आजची कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांच्यासोबत वरिष्ठ लिपीक विजय नडगे, विवेक घुटूकडे, कनिष्ठ अभियंता जितेश पाटील आणि कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र सुरक्षा बळ (एमएसएफ)च्या संरक्षणात ही सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांनी ही धडक मोहीम पार पाडली.
What's Your Reaction?






