वसईत दिव्यांग सक्षमीकरण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; बचत गट आणि शासकीय योजनांची माहिती मिळाली

वसई : वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी वसई तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये अपंग कल्याणकारी संस्थेकडून 20 मार्च 2025 रोजी दिव्यांग सक्षमीकरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात दिव्यांगांसदर्भातील विविध योजना, दिव्यांगांचे बचत गट यांची माहिती देण्यात आली. अपंग कल्याणकारी संस्थेचे मुख्य सल्लागार आदिवासी सेवक श्री गंगाधर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष शमीम खान यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये एकूण 127 दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला वसई विरार मनपा दिव्यांग विभागाच्या समन्वयक श्रीमती रुपाली कदम, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती आरती रंबन, नारी शक्ती संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती राजल नाईक, डॉ. रोहन कुलूर, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री उत्तम वटकर, सुशील ओगले, भाजप उपाध्यक्ष संतोष काकड उपस्थित होते.
वसई विरार मनपा दिव्यांग विभागाच्या समन्वयक रूपाली कदम यांनी दिव्यांग व्यक्तींचे बचत गट आणि त्यांची नियामावली याविषयी माहिती दिली. दिव्यांग बचत गट झाल्यानंतर मिळणारे अनुदान व त्या माध्यमातून दिव्यांगांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी बचत गटाचे महत्त्व रुपाली कदम यांनी यावेळी उपस्थितांना पटवून दिले.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती आरती रंबन यांनी महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. दिव्यांग महिलांना एक टक्का कमी व्याजदर असल्याचे त्यांनी सांगितले. महिला हक्कांसाठी लढणाऱ्या नारी शक्ती संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती राजल नाईक यांनी दिव्यांग महिलेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तर तिला पूर्ण मदत करण्याची ग्वाही दिली.
डॉ. रोहन कुलूर यांनी दिव्यांग महिलांचे आरोग्य विषयी माहिती दिली तसेच दिव्यांगांवर मोफत उपचाराची डॉ. कुलूर यांनी ग्वाही दिली. दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री उत्तम वटकर यांनी दिव्यांग पुनर्वसन केंद्राबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की नुकताच महापालिकेसोबत दिव्यांगांसाठी दिव्यांग योजना मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन मनपा आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी फार मोठी जबाबदारी स्वीकारून काम करणारे संस्थेचे सल्लागार सुशील ओगले यांनी तहसील कार्यालयाचे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय तहसीलदार यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला भाजप उपाध्यक्ष संतोष काकड यांनी सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमादरम्यान दिव्यांगांच्या प्रश्नांचे उपस्थितांनी निरसन केले. यावेळी दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अनिवार्य असलेले युडीआयडी कार्डचे वाटप करण्यात आले आणि दिव्यांग व्यक्तींच्या रोजगार संदर्भातल्या दिव्यांग व्यक्तींना स्टॉल मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांची आवश्यकता असलेल्या दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अपंग कल्याणकारी संस्थेचे सदस्य सत्यम थाटू, राकेश पाटील, दिगंबर दांडेकर, प्राजक्ता मॅडम, नरेश पाटील, सुभाष राठोड, इत्यादींनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






