वसईत लाखोंची खैर तस्करी उघड! वन कर्मचाऱ्यांचा फिल्मी स्टाईल थरार, पाठलाग करून दोन वाहने पकडली

वसईत लाखोंची खैर तस्करी उघड! वन कर्मचाऱ्यांचा फिल्मी स्टाईल थरार, पाठलाग करून दोन वाहने पकडली
वसईत लाखोंची खैर तस्करी उघड! वन कर्मचाऱ्यांचा फिल्मी स्टाईल थरार, पाठलाग करून दोन वाहने पकडली

विरार:वसई पूर्वेतील महामार्गावरून होणाऱ्या लाखोंच्या खैर तस्करीचा पर्दाफाश करण्यात वनविकास महामंडळ मांडवी, शिरसाड व गणेशपुरी कार्यकेंद्रातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे. त्यांनी फिल्मी स्टाईलने महामार्गावर पळून जाणाऱ्या वाहनाचा थरारक पाठलाग करत दोन वाहने जप्त केली आहेत. पहिली घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. वनविकास महामंडळाच्या शिरसाड आणि मांडवी व गणेशपुरीच्या वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती की, त्यांच्या कार्यक्षेत्रात तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून वनोपज मालाची तस्करी होणार आहे. याची पक्की खबर मिळाल्यानंतर, वन परिक्षेत्र अधिकारी आर.एम. सोनवणे व त्यांच्या पथकाने दोन ठिकाणी सापळा रचला आणि गस्त सुरू केली. पहिली घटना भाताणे वनपरिमंडळ हद्दीत घडली, जेव्हा एका संशयित वाहनाने वन अधिकाऱ्यांचे सिग्नल न मानता गाडी सोडून जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला. वन अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यात ७८ खैर ओंडके आढळले, ज्याची अंदाजित किंमत ₹८५,००० आहे. तसेच एम.एच. ४१ ए.यु. ६६०९ क्रमांकाचे वाहन जप्त करण्यात आले, ज्याची किंमत ₹७ लाख आहे. दुसरी घटना २७ ऑगस्ट रोजी घडली, जेव्हा वन अधिकाऱ्यांनी आणखी एक वाहन पकडले. मध्यरात्री २:२५ वाजता, खानिवडे टोल नाका ओलांडण्याऐवजी वाहन चालकाने वाहन हिमाचल पंजाब हॉटेलजवळ थांबवले. वन कर्मचाऱ्यांनी वाहनाच्या दिशेने जाऊन त्यास हटकले, परंतु तस्करांनी वाहन सुरूच ठेवत महामार्गावरून मनोरच्या दिशेने पळवले. कर्मचाऱ्यांनी थरारक पाठलाग करत शेवटी वाहन ताब्यात घेतले. या वाहनात १०९ खैर ओंडके आढळले, ज्याची किंमत ₹२२,६३८ आहे. वाहनाची किंमत ₹५ लाख आहे. या २४ तासांच्या अंतरात वन विभागाने दोन मोठ्या खैर तस्करीचे प्रकार उघड केले असून, पुढील तपास सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow