वसई: इव्हीएमला विरोध करत टिवरी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव

वसईतील टिवरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी इव्हीएम मशीन हद्दपार करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव पारित केला आहे. या ठरावाला गावच्या पोलीस पाटलानेदेखील अनुमोदन दिले असून हा टिवरी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव जिल्हा स्तरावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

वसई: इव्हीएमला विरोध करत टिवरी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव
वसई -  महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक लागल्यानंतर इव्हीएम मतमोजणीवर शंका उपस्थित केली जात आहे. याच धर्तीवर सोलापूरातील मारकडवाडीतल्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेत एव्हीएम मतमोजणीला आव्हान दिल्यानंतर आता वसईतील टिवरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी देखील  इव्हीएम मशीन हद्दपार करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव पारित केला आहे. या ठरावाला गावच्या पोलीस पाटलांनी देखील अनुमोदन दिले असून हा टिवरी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव सध्या जिल्हा स्तरावर  चर्चेचा विषय ठरला आहे.
राज्यभरात इव्हीएम मशीन मधील मतमोजणीचा मुद्दा प्रचंड गाजला आहे. केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर मतदान केलेल्या मतदारांकडूनही  इव्हीएम मतमोजणीवर शंका उपस्थित होत आहे. याच धर्तीवर मारकडवाडी ग्रामस्थांच्या बॅलेट पेपरवरील मतदानाचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. वसईतील टिवरी ग्रामपंचायीनेदेखील इव्हीएम मशीनविरोधात एकमत दाखवत बॅलेट पेपरवरच मतदान घेण्याचा ठराव पारित केला आहे. दरम्यान, टिवरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नुतनकुमार भोईर यांच्या अध्यक्षतेखाली, माजी उपसरपंच नंदकुमार चौधरी हे सूचक असलेल्या 20 डिसेंबरच्या ग्रामसभेत टिवरी ग्रामस्थांनी एकमताने इव्हीएम हटावचा नारा देत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे एकमताने मंजूर केले आहे. तसा ठराव पारित झाला असून या ठरावाला गावचे पोलीस पाटील अजित भोईर यांनी अनुमोदन दिले आहे.
असा ठराव करणारी टिवरी ग्रामपंचायत पालघर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली असून या ग्रामपंचायतीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर इतर ग्रामपंचायतीतही अशाच स्वरूपाचे निर्णय घेण्यास नागरिक पुढाकार घेतील असा एकंदर अंदाज आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow