विरारच्या जीवदानी मंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था : राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून आढावा

विरारच्या जीवदानी मंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था : राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून आढावा

विरार:आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विरारच्या प्रसिध्द जीवदानी मंदिराच्या सुरक्षेचा राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून आढावा घेण्यात आला आहे. घातपाताची शक्यता गृहीत धरून मंदिराची सुरक्षा व्यव्यस्था चोख ठेवण्यात आली आहे. मंदिरावर शस्त्रधारी पोलिसांबरोबर दिडशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

पालघर जिल्ह्यातील विरार मध्ये असलेले जीवदानी मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाते. नवरात्रोत्सवात जीवदानी गडावर मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंदिर परिसरात  १५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. मंदिर परिसरात कोणताही घाटपात होऊ नये म्हणून शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती मंदिराच्या विश्वस्थांनी दिली. घातपाताची शक्यता गृहीत धरून राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने मंदिर परिसराच्या सुरक्षेचा आढावा घेतला आणि सुरक्षा कवच तयार करण्यात आले आहे. 

नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात लाखोंच्या संख्येने भाविक  मंदिरात येत असतात. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक हत्यारबंद पोलिसांबरोबर  विवा महाविद्यालयाचे दोनशेहून अधिक राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी)  विद्यार्थी हजर असणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गडावर ५० हजाराच्या आसपास भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. नवरात्रोत्सवात येणाऱ्या रविवारी हाच गर्दीचा आकडा लाखांपर्यत जाण्याची श्यक्यता आहे. त्या दृष्टीने गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेची तयारी करण्यात आल्याचे जीवदानी मंदिराचे विश्वस्त प्रदीप तेंडोलकर यांनी सांगितले, जीवदानी मंदिरात जण्यासाठी असलेल्या फेनिक्युलरची  चाचणी देखील यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow