वसई कला-क्रीडा महोत्सवातर्फे २५ डिसेंबरला 'ख्रिसमस फिटनेस रन' चे आयोजन
विरार पश्चिमेच्या नानभाट चर्च ते नरवीर चिमाजी आप्पा मैदान या मार्गावर २५ डिसेंबरला दुपारी ४ वाजता या रनचे आयोजन करण्यात आले आहे.

वसई - वसई कला क्रीडा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला तसेच ख्रिसमस सणाचे औचित्य साधून वसई कला क्रीडा महोत्सवातर्फे 'ख्रिसमस फिटनेस रन' चे आयोजन करण्यात आले आहे. समाजात सुदृढ आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश पोहोचावा यासाठी या रनचे आयोजन करण्यात आले आहे. विरार पश्चिमेच्या नानभाट चर्च ते नरवीर चिमाजी आप्पा मैदान या मार्गावर २५ डिसेंबरला दुपारी ४ वाजता या रनचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धकांना क्रीडा क्षेत्रात प्रेरणा मिळावी यासाठी काही पाहुणे यावेळी उपस्थित राहणार आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास पूर्ण केलेले वसईकर ज्यूड परेरा, सचिन कवळी आणि प्रणय राऊत तसेच लडाख खारदूंगला पास येथे प्रतिकूल हवामान परीस्थितीत ७२ किमी अल्ट्रा मॅरेथॉन रान पूर्ण करणारे स्वप्नील पाटील आणि जैसलमेर ते लोंगेवाला अशी १८० किमीची बॉर्डर रेस २२ तासात पूर्ण करणारे प्रशांत चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
यंग स्टार ट्रस्ट विरार,वसई विरार शहर महानगरपालिका तसेच वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या सहकार्याने वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा महोत्सवाचे ३५ वर्ष असून, यंदा ५५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी या महोत्सवात आपला सहभाग नोंदवला आहे. वसई कला क्रीडा महोत्सव हा संपूर्ण वसई तालुक्यात प्रसिद्ध असून परिसरातील विद्यार्थी आणि स्पर्धक दरवर्षी या महोत्सवात उत्साहाने सहभागी होत असतात. तसेच वसई बाहेरील विशेषतः मुंबईतील कला-क्रीडा प्रेमी देखील या महोत्सवाला आवर्जून भेट देत असतात.
What's Your Reaction?






