वसई-विरार महापालिकेकडून ६६५२ गोविंदांना विमा संरक्षण

वसई, दि. १२ ऑगस्ट २०२५ : येत्या १६ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी (गोपाळकाला) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने त्यांना विमा संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत यंदा शहरातील एकूण ९९ गोविंदा पथकांतील ६६५२ गोविंदांचा विमा काढण्यात आला आहे. हे विमा संरक्षण मे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत करण्यात आले असून, अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत वैध राहणार आहे.
गोविंदांना विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले असले तरी दहीहंडी उत्सव आयोजित करणाऱ्या मंडळांनी उत्सवस्थळी सर्व आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. गोविंदांच्या शारीरिक सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आयोजकांवर असणार असून कोणालाही दुखापत होणार नाही यासाठी सर्वतोपरी दक्षता घेणे गरजेचे आहे, असे आवाहन वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले आहे.
दहीहंडी हा महाराष्ट्रातील एक उत्साहवर्धक आणि पारंपरिक सण असून, उत्सवाच्या निमित्ताने तरुणाई मोठ्या प्रमाणावर सहभाग घेते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महापालिकेचा विमा संरक्षणाचा उपक्रम हा गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी एक सकारात्मक आणि स्वागतार्ह पाऊल ठरत आहे.
What's Your Reaction?






