वसई-विरार | १२ ऑगस्ट २०२५: वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत यावर्षीही “घरोघरी तिरंगा” मोहिम मोठ्या उत्साहात राबवण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून आज दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजता, महानगरपालिका मुख्यालयातून ३ कि.मी.च्या “तिरंगा दौड” चे आयोजन करण्यात आले.
या तिरंगा दौडीत विविध शाळांमधील विद्यार्थी, धावपटू व नागरिकांनी सहभाग घेतला. ३० फूट लांबीचा भव्य तिरंगा हातात घेऊन सहभागी नागरिकांनी देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. एकूण ३०० पेक्षा अधिक सहभागी या दौडीत सहभागी झाले. या वेळी शालेय शिक्षक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशप्रेमाने भारलेले हे दृश्य उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
महापालिकेच्या विविध प्रभाग समित्यांमार्फत “बाईक रॅली” व “वृक्षारोपण कार्यक्रम” देखील आयोजित करण्यात आले. बाईक रॅलीत प्रभाग समित्यांचे अधिकारी-कर्मचारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांनी भाग घेतला. हातात तिरंगा ध्वज घेऊन त्यांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी देशभक्तीचा जागर केला.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत आपल्या घरावर, इमारतीवर किंवा आस्थापनेवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले. ही मोहिम प्रत्येक नागरिकाने अंगीकारावी, असा संदेश देण्यात आला. वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण संवर्धनालाही चालना देण्यात आली.

Previous
Article